Court File Photo
नाशिक

Nashik Bomb Threat | नाशिक जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सहावा मजला उडवण्याचा ई-मेल

Nashik Bomb Threat | नाशिक न्यायालयात बॉम्बची धमकी मिळताच कर्मचारी आणि नागरिकांची पळापळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

न्यायालयामध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रम सुरू होत असतानाच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल गुरुवारी (दि. २६) प्राप्त झाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी न्यायालयाचा सहावा मजला उडवून देण्याचा इशारा ई-मेलद्वारे देण्यात आला.

महिनभराच्या कालावधीत न्यायालयाला धमकीचा मेल येण्याची ही दुसरी घटना असल्याने न्यायालय प्रशासनासह पोलिस यंत्रणा सतर्क झाली. या प्रकारामुळे न्यायालयातील कर्मचारी, वकील आणि पक्षकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी सकाळी न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर धमकीच्या ई-मेलची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर याबाबत न्यायालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक न्यायालय परिसरात दाखल झाले.

खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपासणी मोहीम हाती घेतली. धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयातील कर्मचारी आणि नागरिकांची इमारतीबाहेर पडण्यासाठी धावपळ उडाली. अनेक कर्मचारी घाईघाईने बाहेर आले.

पोलिसांनी न्यायालयाच्या सहाव्या मजल्यासह संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू केली. पार्किंगस्थळ, प्रतीक्षालय, विविध कोर्ट रूम, लिफ्ट, जिने आणि न्यायालय आवारातील टपालपेटीचीही झडती घेण्यात आली. प्रत्येक संशयास्पद ठिकाणी बारकाईने तपासणी करण्यात आली.

न्यायालयात दररोज मोठ्या संख्येने न्यायाधीश, वकील, पक्षकार, कर्मचारी आणि नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. या तपासणीमुळे न्यायालयाचे कामकाज सुमारे तासभर काही प्रमाणात विस्कळीत झाले.

धमकीच्या मेलचा स्रोत शोधण्याचे आव्हान

महिनभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे न्यायालयीन कामकाज आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, धमकीचा ई-मेल कोठून पाठविण्यात आला, त्यामागे कोण आहे आणि हा खोडसाळपणा आहे की, गंभीर कट, या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT