Drug Case | नाशिकमधील बंद गोदामे पोलिसांच्या रडारवर; ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांची धडक कारवाई

Drug Case | शहरात अवैध अमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Drug Case
Drug Case Pudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात अवैध अमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील तब्बल १०९ बंद गोदामे आणि कारखान्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, या तपासणीदरम्यान कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वस्तू अथवा अमली पदार्थांशी संबंधित बाबी आढळून आलेल्या नाहीत.

Drug Case
Hostel Girls Harassment | हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवून धमकी; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध मार्गाने अमली पदार्थांची निर्मिती आणि साठवणूक करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी बंद गोदामे व कारखान्यांची विशेष तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी (दि. २५) पोलिस उपायुक्त (गुन्हे) तसेच परिमंडळ एक व दोनच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबई नाका, सातपूर, अंबड, इंदिरानगर, एमआयडीसी, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील बंद गोदामे, कारखाने व कंपन्यांची तपासणी करण्यात आली. एकाच वेळी तपासणीची मोहीम राबविल्याने शहरातील औद्योगिक आणि गोदाम परिसर पोलिसांच्या रडारवर आले होते.

Drug Case
Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्यात 12 कोटी भाविक येणार! अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना

तपासणीदरम्यान बंद असलेल्या गोदामांमध्ये तसेच कारखान्यांमध्ये अमली पदार्थांचा साठा, संशयास्पद वस्तू किंवा अमली पदार्थांशी संबंधित अन्य बाबी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे तपासणी मोहीम निष्पन्न झाली नसली, तरी अवैध अमली पदार्थाच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही व्यापक तपासणी केली. अवैध व्यवसायात सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

तपासणी मोहिमेची आकडेवारी

  • एकूण तपासणी : १०९ बंद गोदामे व कारखाने.

  • मोहीम राबविण्याची तारीख : २५ नोव्हेंबर.

  • तपासणीचा परिसर : नाशिक शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दी.

  • संशयास्पद वस्तू : आढळून आल्या नाहीत.

  • आधार : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाचे प्रसिद्धीपत्रक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.