TET Exam Pudhari
नाशिक

Nashik TET Exam Preparation | जिल्ह्यात 41 हजार उमेदवारांची 'टीईटी'

Nashik TET Exam Preparation | २८ जूनला आयोजन ; बनावटगिरी रोखण्यासाठी हायटेक तंत्रज्ञान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील १०१ परीक्षा केंद्रांवर दोन्ही पेपरसाठी एकूण ४१ हजार २८० परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.

यंदाच्या परीक्षेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, परीक्षेत होणारी संभाव्य बनावटगिरी आणि डमी उमेदवारांना रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे परीक्षेचे नियोजन केले आहे. मागील परीक्षांमध्ये झालेले गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा प्रशासन अत्यंत सतर्क आहे.

बनावट परीक्षार्थीना प्रतिबंध करण्यासाठी मागील वर्षी परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या फोटोंची पडताळणी यंदाच्या परीक्षार्थीच्या फोटोंसोबत थेट परीक्षा केंद्रावर डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे केली जाणार आहे. यामुळे डमी उमेदवार बसवून परीक्षा देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात पेपर १ साठी ३८ परीक्षा केंद्र असून त्याठिकाणी १६ हजार ९२१ परीक्षार्थी प्रविष्ट होतील. तसेच पेपर २ साठी ६३ केंद्रांवर २४ हजार ३५९ परीक्षार्थी प्रविष्ट होतील. पेपर क्रमांक एक हा सकाळी १०:३० ते दुपारी १ या वेळेत घेतला जाईल. तर पेपर क्रमांक दोन हा दुपारी २:३० ते ५ या वेळेत होईल.

परीक्षार्थीना परीक्षागृहात प्रवेशासाठी ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना किंवा मतदान ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. नावात बदल असल्यास राजपत्र, अधिसूचना, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन असून या समितीची बैठक झाली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पोलिस उपनिरीक्षक मनीषा शिंदे, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, डॉ. मिता चौधरी, गणेश आकुसकर, दिलीप जऊळकर, रंजना लोरे, अनिल पुदाट, संतोष झोले उपस्थित होते.

महत्त्वाच्या बाबी

परीक्षा केंद्रावर 'एआय' नियंत्रित सीसीटीव्ही यंत्रणा मोबाइल फोन, गणकयंत्र, पेजर, कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी परीक्षा सुरू होण्याच्या २० मिनिटे आधी प्रवेश केंद्र संचालक, परीक्षा नियंत्रण कक्ष आणि परीक्षा परिषद यांना जोडणारी हॉटलाइन प्रणाली इलेक्ट्रॉनिक साहित्य, वह्या, पुस्तके घेऊन जाण्यास बंदी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT