नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने नाशिक महापालिकेला २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. 'महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद' या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून प्रामुख्याने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये विकासकामे केली जाणार आहेत.
सदिच्छानगर येथील जलतरण तलावाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी १० कोटी रुपयांची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय विविध ठिकाणी सामाजिक सभागृहे, सभामंडप, स्मशानभूमी विकास, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, खेळाची मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याच्या कामांचा समावेश आहे. माहेरघर मंगल कार्यालय येथे पूल बांधण्यासह सातपूर भाजी मार्केटमध्ये शौचालय, ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलचे नूतनीकरण आणि विविध परिसरांमध्ये नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत असताना, या निधीतून स्थानिक पातळीवरील सुविधांनाही चालना मिळणार आहे.
मंजूर निधीचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार असून, कामांची अंमलबजावणी महापालिकेमार्फत केली जाणार आहे. सर्व कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. निविदेनंतर कामांचा खर्च मंजूर रकमेपेक्षा वाढल्यास अतिरिक्त निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
मंजूर २० कोटींतून होणारी विकासकामे
सदिच्छानगर जलतरण तलावाची उर्वरित कामे-१०.०० कोटी, माधवनगर येथे जॉगिंग ट्रॅक- २० लाख, सोमेश्वर कॉलनी येथे सभामंडप ३० लाख, संभाजीनगर येथे सभामंडप ४० लाख, विस्डम हायस्कूलसमोरील ज्येष्ठ नागरिक संघ हॉल नूतनीकरण- २० लाख, अश्विनीनगर येथे सभागृह-२५ लाख, कामटवाडे स्मशानभूमी विकास ६० लाख, आनंदवल्ली येथे स्मशानभूमी व दशक्रिया शेड ५० लाख, अंबड स्मशानभूमी विकास व रस्ता काँक्रिटीकरण २५ लाख, कामटवाडे स्मशानभूमी विकास ६० लाख, आनंदवल्ली येथे स्मशानभूमी व दशक्रिया शेड ५० लाख, अंबड स्मशानभूमी विकास व रस्ता काँक्रिटीकरण - २५ लाख, डॅफोडिल्स सोसायटी येथील खेळाचे मैदान- २० लाख, सातपूर भाजी मार्केट येथे शौचालय- २५ लाख.
माहेरघर मंगल कार्यालय येथे पूल- १.४० कोटी, श्रीकृष्ण चौक येथे एआया काळी सभामंडप - १५ कोटी, शिवनेरी चौक येथे सामाजिक सभागृह- २० लाख, सोमेश्वर कॉलनी येथे सामाजिक डोम २५ लाख, सिंहस्थनगर येथे सामाजिक सभागृह - ६० लाख, पंडितनगर येथे खेळाचे मैदान- २० लाख, दत्त चौक येथे सामाजिक सभागृह - ६० लाख, इच्छामणी कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरण- १ कोटी, गणेश कॉलनी येथे फरशी बसवणे- २५ लाख, वृंदावननगर, कामटवाडे येथे सामाजिक सभामंडप - २५ लाख, अहिल्याबाई होळकर चौक येथे सामाजिक सभामंडप - ३० लाख, श्रीरामनगर, फुले मळा येथे खेळाचे मैदान- ५० लाख, पवननगर मैदान येथे जॉगिंग ट्रॅक- ४० लाख, कामटवाडे येथील देवकीनंदन सोसायटीत सामाजिक सभागृह- २५ लाख, इच्छामणी कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरण- २५ लाख, वासुदेवानंद सोसायटी, कामटवाडे येथे सामाजिक सभागृह - २५.
निधी खर्चाची जिल्हाधिकारी करणार
खातरजमा कामांचा दर्जा, निधीचा योग्य विनियोग आणि मंजूर कामांनुसारच खर्च होत असल्याची खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. तसेच कामे सुरू करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे ठेवणे आणि त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाची कामे पूर्ण झाल्यानंतरच संबंधित रस्त्यांची कामे हाती घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नव्याने तयार केलेल्या रस्त्यांचे पुन्हा खोदकाम होऊन सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.