Rajasthan Laborer Killed
देवळा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी रमेश शिवाजी शेवाळे यांच्या शेतातील जुन्या विहिरीच्या खोदकामादरम्यान सोमवारी (दि. ६ ) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुर्गटना घडली. विहिरीतील पाणी उपसण्यासाठी बसविण्यात आलेल्या मोटारीचा वायर रोप अचानक तुटल्याने अवजड मोटार थेट विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत राजस्थानमधील चेतन लाडूराम मेघवंशी (वय ३०) या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुरेश बालूराम हरिजन हे गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, खामखेडा येथील गट क्रमांक २२४ मधील रमेश शिवाजी शेवाळे यांच्या जुन्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. हे काम राजस्थानमधील मजुरांकडून केले जात होते. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तीन मजूर विहिरीत उतरून काम करीत असताना विहिरीतील पाणी उपसण्यासाठी वर बसविण्यात आलेली मोटार वायर रोपच्या साहाय्याने लावण्यात आली होती. मात्र, अचानक वायर रोप तुटल्याने मोटार थेट विहिरीत कोसळून खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडली. या घटनेने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या अपघातात चेतन लाडूराम मेघवंशी (रा. देवीपुरा, ता. मसुदा, जि. ब्यावर, राजस्थान) यांच्या डोक्यावर मोटार पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय देवळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत सुरेश बालूराम हरिजन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय, कळवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, मयत चेतन लाडूराम मेघवंशी यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी राजस्थान येथे रवाना करण्यात आला.
या प्रकरणी रमेश शिवाजी शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे,पोलीस शिपाई सुरेश कोरडे करीत आहेत.