Deola Highway Safety Measures Delayed
देवळा : देवळा शहरातून जाणाऱ्या विंचूर–प्रकाश राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे मुख्य काम पूर्ण झाले असले, तरी सुरक्षाविषयक अनेक महत्त्वाच्या उपाययोजना अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष संजय आहेर आणि ज्येष्ठ नगरसेवक जितेंद्र आहेर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटारांची व्यवस्था, वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक, स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर तसेच इतर सुरक्षाविषयक सुविधा अद्याप उभारण्यात आलेल्या नाहीत. याबाबत देवळा नगरपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आवश्यक कार्यवाही झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
मागील महिन्यात कोलथी नदीवरील पुलावर एका अवजड कंटेनरचा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेनंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
देवळा शहरातील महामार्गालगत तीव्र वळणे असून या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वारंवार किरकोळ अपघात घडत असून नागरिकांच्या रोषाला स्थानिक लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत आणि शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष संजय आहेर आणि ज्येष्ठ नगरसेवक जितेंद्र आहेर यांनी दिला आहे.