

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर गोदावरी, वाघाडी नदी आणि शहरातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे पंचवटीसह अनेक भाग चिखल, गाळ, जलपर्णी आणि वाहून आलेल्या कचऱ्याने व्यापले होते. पुराचे पाणी ओसरताच नाशिक महापालिकेने शहराला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ९० टन ८६५ किलो कचरा व जलपर्णी हटवून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
पाणलोट क्षेत्रात बुधवारी (दि.८) झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला हंगामातील पहिला पूर आला होता. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. दुपारी १ नंतर पावसाने उघडीप घेतल्याने, काही तासांत पुराचे पाणी ओसरले. दरम्यान, पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या जलपर्णीचे ढिगारे संपूर्ण रामतीर्थ परिसरात बघायला मिळत असून, ते हटवण्यासाठी प्रशासनातर्फे सकाळपासून मोहीम हाती घेतल्याचे दिसून आले.
गंगापूर धरणातून एक थेंबही पाण्याचा विसर्ग न करता, गोदावरी दुथडी वाहिली. दमदार पावसामुळे शहरातील सर्वच नाले तुडुंब भरून वाहिले. पुढे हे पाणी गोदापात्रात मिसळले गेल्याने, नदीला मोठा पूर आला होता. मात्र, दुपारनंतर पावसाने उघडीप घेतल्याने, पाणी ओसरत गेले. मात्र, पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या जलपर्णी मात्र मोठ्या प्रमाणात रामतीर्थ परिसरात अडकल्याचे दिसून आले.
परिसरातील सर्व मंदिरे तसेच रामसेतू, होळकर या पुलांना जलपर्णीचा फास बसला. ढिगाऱ्यांमध्ये प्लास्टिक, कपडेही मोठ्या प्रमाणात अडकून पडल्याने, गुरुवारी (दि.९) दिवसभर महापालिका प्रशासनाकडून जलपर्णीचे ढिगारे हटविण्याचे काम सुरू होते. जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमधून जलपर्णीचे ढिगारे हटविण्यात आले.
यावेळी वॉटर ग्रेस कंपनीचे कर्मचारी दिवसभर रामतीर्थ परिसरात स्वच्छता करताना दिसून आले. सध्या गोदापात्रामध्ये पाणी दुतोंड्या मारुतीच्या पायाला स्पर्श करून वाहत आहे. त्यामुळे पोलिस तसेच सुरक्षा रक्षकांकडून गोदावरी नदी पात्र परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पर्यटक तसेच भाविकांनी विनाकारण पात्रात उतरू नये, असे आवाहन केले जात आहे.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या रामतीर्थ आणि घाट परिसरातील मंदिरात साचलेला गाळ, जलपर्णी आणि अन्य कचरा हटवून स्वच्छता करण्यात येत आहे. वाघाडी नदीच्या पुरामुळे म्हसोबा आणि गौरी पटांगणात साचलेला गाळ, दगड आणि लाकडे हटवण्यासाठी तीन जेसीबी कार्यरत आहेत.
अग्निशमन विभागाच्या वाहनांद्वारे संपूर्ण परिसर धुवून स्वच्छ करण्यात येत आहे. सातपूर भागातील दादोबा पूल, सातपूर गाव स्मशानभूमी पूल तसेच इतर पुलांवर अडकलेल्या जलपर्णी, झाडांच्या फांद्या आणि कचरा हटवण्यात आला. सोमेश्वर धबधबा परिसरातील संरक्षक रेलिंगमध्ये अडकलेला कचरा आणि जलपर्णीही यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काढून घंटागाड्यांमार्फत उचलण्यात आल्या. याशिवाय शहरातील पूरग्रस्त व पावसामुळे बाधित इतर भागांत गाळ हटवणे, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे तसेच आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरणाची कामेही वेगाने सुरू आहेत. संकलित करण्यात आलेल्या ९० टन ८६५ किलो जलपर्णी व अन्य सेंद्रिय कचऱ्याची खत प्रकल्पात विल्हेवाट लावण्यात आली.
महापौर हिमानी आहिरे, उपमहापौर विलास शिंदे, सभापती मच्छिंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयुक्त मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या समन्वयाने घनकचरा व्यवस्थापन विभाग ही मोहीम राबवत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले आहेत. शहरातील सर्व पूरग्रस्त आणि बाधित भागांची संपूर्ण स्वच्छता पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गोदावरी परिसरात असलेले चेंबर गुरुवारी (दि.९) देखील ओव्हर फ्लो झाल्याचे दिसून आले. चेंबरमधील गटाराचे पाणी थेट नदीपात्रात जात होते. महापालिका प्रशासनाने नालेसफाईचा केलेला दावा पहिल्याच पावसात फोल ठरल्याने, नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गुणवत्ता सुधारण्यासाठी आयआयटी मुंबईमार्फत प्रशिक्षण
सिंहस्थ रस्त्यांची वाट लागल्यानंतर प्राधिकरणाला जाग
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ते विकासकामांच्या गुणवत्तेची पहिल्याच पावसाने 'पोलखोल' केल्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणाला गुणवत्ता नियंत्रणासाठी आयआयटी मुंबईची मदत घ्यावी लागली आहे. रस्त्यांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच कामांच्या प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक पद्धतीने गुणवत्ता तपासणी व्हावी, यासाठी प्राधिकरणाने महापालिकेसह विविध यंत्रणांच्या अभियंत्यांसाठी गुरुवारी (दि. ९) ऑनलाइन तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, गुणवत्ता तपासणीसाठी त्रिस्तरीय यंत्रणा अस्तित्वात असतानाही अनेक रस्त्यांची पहिल्याच पावसात दुरवस्था झाल्याने या प्रशिक्षणाच्या उपयुक्ततेवरही चर्चा सुरू झाली आहे.
सिंहस्थ पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. त्यात रस्ते, घाट, साधुग्राम तसेच इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे. केवळ नाशिक शहरात १२३० कोटी रुपयांच्या खर्चातून २४ रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि निकृष्ट दर्जाची कामे समोर आल्याने कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या सहकार्याने आयोजित प्रशिक्षणात डॉ. धर्मवीर सिंग यांनी अभियंत्यांना मार्गदर्शन केले. डेंस बिटुमिनस मॅकॅडम, बिटुमिनस काँक्रीट, रस्त्यांच्या विविध थरांची घनता, वैज्ञानिक गुणवत्ता तपासणी, आधुनिक गुणवत्ता नियंत्रण प्रणाली, चाचणीची अचूक पद्धत, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते उभारणीसाठी आवश्यक अभियांत्रिकी निकषांबाबत माहिती दिली.
रस्त्यांची मजबुती आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी घनता तपासणी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रशिक्षणास कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, उपायुक्त योगेंद्र चौधरी यांच्यासह नाशिक मनपाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या विभागांना प्रशिक्षण
ऑनलाइन प्रशिक्षणात सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, नाशिक महापालिका, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग विभाग, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, शिर्डी नगर परिषदेचे अभियंते आणि अधिकारी सहभागी झाले. पहिल्याच पावसाने उघड झालेल्या त्रुटींनंतर हे प्रशिक्षण भविष्यातील कामाचा दर्जा उंचावण्यास कितपत उपयोगी ठरते, याकडे आता नागरिकांसह माधिमचे लक्ष लागले आहे.