नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील एकूण २६ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये आज अखेर केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. अद्याप मे महिना बाकी असून, महिनाभरात हा साठा आणखी घटण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाई तीव्र होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात सात मोठे सिंचन प्रकल्प, तर १९ मध्यम प्रकल्प असे एकूण २६ सिंचन प्रकल्प आहे. मागील पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. त्यात बेमोसमी पावसाची भर पडल्याने सिंचन साठ्यात वाढ झाली होती, मात्र यंदा एप्रिल महिन्यापासून वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
मागील वर्षी आजमितीस २७ टक्के पाणीसाठा होता, तर या वर्षी आज अखेर ३५ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाचा विचार केला तर गंगापूर धरण समूहात पाणीसाठा ३७.८ टक्के होता.
तर पालखेड धरण समूहात १६.५५ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी गंगापूर धरण समूहात ५०.५६ टक्के, पालखेड धरण समूहात २८.५५ टक्के, तर गिरणा खोरे धरण समूहात ४८.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
२८१ गावांना टँकरचा आधार
हवामान अंदाजानुसार या वर्षी पाऊस लांबणीवर जाणार असल्याने साधारण दोन महिने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शिल्लक ३५ टक्के पाणीसाठा जिल्हाभरातील गावांना पुरेसा नाही. सध्या २८१ गावांमध्ये पाणीटंचाई असून, त्या ठिकाणी ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याकरिता २९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.