Cyber Crime pudhari photo
नाशिक

Nashik Cyber Crime | नाशिकमध्ये सायबर भामट्यांचा धुमाकूळ! दोन घटनांत नागरिकांना 64 लाखांचा गंडा

Nashik Cyber Crime | मनी लाँड्रिंगच्या नावाखाली अटकेची धमकी; नाशिकमध्ये 18 लाखांची ऑनलाइन फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात सायबर भामट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना तब्बल ६४ लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगून अटकेची भीती दाखविणे, तसेच सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून मानसिक दबाव निर्माण करणे, अशा पद्धतीने सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले.

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. पहिल्या घटनेत सायबर भामट्यांनी ७ ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत फिर्यादीशी संपर्क साधला. संशयितांनी व्हॉट्सॲप कॉल, व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगच्या माध्यमातून संपर्क साधत दिल्ली पोलिस असल्याचे भासविले.

फिर्यादी यांचा मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगून अटक करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे त्यांची १८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या घटनेत २७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान इंटरनेट आणि फोन कॉलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून अटकेची भीती दाखवली. तसेच मानसिक दबाव निर्माण करून त्यांच्याकडून एकूण ४६ लाख रुपये उकळले.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे करीत आहेत. या गुन्ह्यांमध्ये संशयितांनी अनेक मोबाइल क्रमांकांचा वापर केला असून, आर्थिक व्यवहारांसाठी बँक खात्यांचा आधार घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून संबंधित मोबाइल क्रमांक, बँक खात्यांचे व्यवहार आणि पैशांच्या हस्तांतरणाची साखळी तपासली जात आहे.

सावध राहण्याचे आवाहन

कोणताही पोलिस अधिकारी वा सरकारी तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलद्वारे अटक करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करत नाही. अशा प्रकारचे फोन आल्यास घाबरून न जाता पैशांचे व्यवहार करू नयेत.

अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची माहिती, ओटीपी वा वैयक्तिक तपशील देऊ नयेत. संशयास्पद कॉल किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT