ठळक मुद्दे
सायबर चोरट्यांकडून ऑनलाईन गंडविण्याचे प्रकार सुरूच
Fake Link द्वारे आभासी नफा दाखवून भामट्यांनी केली फसवणूक
अल्पावधीत जास्त आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष
नाशिक : सायबर चोरट्यांकडून ऑनलाईन गंडविण्याचे प्रकार सुरूच असून, इंदिरानगर परिसरातील आणखी एका व्यावसायिकाला तब्बल १५ लाख ८५ हजार रुपयांना फटका बसला आहे. आभासी नफा दाखवून भामट्यांनी ही फसवणूक केली असून, याबाबतचा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
लघुउद्योजक असलेल्या ४० वर्षीय व्यावसायिकाच्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी १३ जून ते ५ ऑगस्ट दरम्यान, 919580285801 आणि (951)556-9210 या मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. अल्पावधीत जास्त आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सतत चॅटिंग व मेसेजेसद्वारे त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले.
संशयितांनी ‘https://usaamex-cc/h5/#/’ ही लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले. तसे केले असता बिटकॉइन ट्रेडिंगसंबंधी माहिती आणि एक आभासी लेआऊट दिसला. याने प्रभावित होऊन त्यांनी गुंतवणुकीस समर्थता दर्शविली. काही रक्कम भरली. त्यानंतर वेबसाईटच्या पोर्टफोलिओवर नफा दर्शविला गेला. हा नफा मिळेल, या आशेने व्यावसायिकाने काही दिवसांतच १५ लाख ८५ हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग केले.
व्यावसायिकाने आर्थिक गुंतवणूक करताच त्याच्या पाेर्टफाेलिओवर संशयास्पद वेबसाईटवरुन ५० यूएसडीटी अर्थात चार हजार ३८९ रुपयांचा नफा दाखविण्यात आला. तसेच, कालांतराने पाच हजार रुपयांचा परतावा त्यांच्या बँक खात्यात क्रेडिट झाला. त्यातून विश्वास बसल्याने व्यावसायिकाने अधिक पैसे गुंतविले. तेव्हा सायबर चाेरट्यांनी १२ हजार यूएसडीटी रक्कम जमा करण्यास सांगितले असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आले.