सदाशिवनगरला फ्लॅटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह File Photo
नाशिक

Nashik Crime | सदाशिवनगरला फ्लॅटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, पती बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी शिवारातील सदाशिवनगर येथील कृष्णा प्राइड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गुरुवारी (दि. २९) दुपारी महिलेचा मृतदेह आढळून आला. निशा मयूर नागरे (वय अंदाजे ३५) असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महिलेचा पती बेपत्ता असून, महिलेचा मोबाइल व कागदपत्रे घरात आढळून आली नाहीत. त्यामुळे पतीने महिलेचा खून केल्याचा संशय आहे.

इंदिरानगर पोलिस व घरमालकाच्या माहितीनुसार, निशा ही मुंबईतील हॉटेलमध्ये कामास होती. तर तिच्यासोबत राहणारा मयूर नागरे याचे कोणार्कनगर येथे हॉटेल असल्याचे समजते. बुधवारी (दि. २८) दुपारी घरकामास आलेल्या मोलकरीण संगीता खिल्लारे या निशा यांच्या घरी कामास गेल्या असता निशा व मयूर यांनी सांगितले की, आम्हाला हॉटेलला जायचे आहे. तुम्ही काम लवकर आवरा. त्यानुसार संगीता काम आवरून गेल्या. त्यानंतर गुरुवारी (दि.२९) दुपारी नेहमीप्रमाणे साडेबाराच्या सुमारास संगीता कामासाठी निशा यांच्या घरी गेल्या. त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडून घरात गेल्या. त्यावेळी बेडवर निशा निपचित पडल्याचे आढळून आले. त्यामुळे संगीता यांनी इमारतीतील इतर रहिवाशांना माहिती दिली. रहिवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर, उपनिरीक्षक संतोष फुंदे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदन शुक्रवारी (दि.३०) सकाळी फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत केले जाणार आहे. यानंतर या महिलेच्या मृत्यूमागील नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अडीच वर्षांपासून वास्तव्य

निशा व मयूर हे दोघे अडीच वर्षांपासून फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वाने राहत होते. याआधी खालील मजल्यावरील फ्लॅटमध्ये दोघे भाडेतत्त्वाने राहत होते. दोघांच्या नातलग किंवा मित्रपरिवाराबाबत माहिती घरमालक किंवा शेजारच्यांना नव्हती. पोलिस निशाचे नातलग व मयूर याचाही शोध घेत आहेत.

महिलेचा मृत्यू संशयास्पद आहे. शवविच्छेदन अहवालानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. आम्ही मृत महिलेची तसेच तिच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करीत आहोत.
- शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT