ॲड. प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी आणखी दोघांना अटक file photo
नाशिक

Nashik Crime Update | ॲड. प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी आणखी दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

सिडको : सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर सुमारे अडीच वर्षांपूर्वी गोळीबार केल्याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने गत आठवड्यात तिघांना अटक केली होती. तिघांकडे केलेल्या चौकशीतून अंबड पोलिसांनी सोमवारी (दि.९) आणखीन दोघांना अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांची संख्या पाच झाली आहे.

अॅड. जाधव यांच्यावर १४ फेब्रवारी २०२२ मध्ये मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी अंबड पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरवातीस आकाश आनंद सुर्यतळ (२४, रा. पंचशिलनगर) यास अटक केली. त्याच्याकडील चौकशीतून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सनि रावसाहेब पगारे (३४) व श्रीकांत माणिक वाकुळे (३२, दोघे रा. जेतवननगर) यांनाही अटक केली. त्यांच्याकडील सखोल चौकशीतून आणखीन दोन नावे समोर आले. त्यात अंकुश लक्ष्मण शेवाळे (३३, रा. धनलक्ष्मी चौक, सिडको) व प्रसाद संजय शिंदे (२९, रा. नांदुरगाव) यांना पकडले. संशयित अंकुश हा मेकॅनिकल इंजिनियर असून तो स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याकडे वावरत असल्याचे उघड झाले आहे. तर संशयित प्रसाद हा बॅंकेशी संबंधित आर्थिक कामकाज करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही रविवारपर्यंत (दि.१५) पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ करीत आहेत.

सुपारी देणारा फरार

संशयितांनी अट्टल गुन्हेगार मयुर बेद याच्या सांगण्यावरून अॅड. जाधव यांच्यावर गोळीबार केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. मयुर बेद यास सिडकोतील एकाने सुपारी देत गोळीबार केला. तर मयुरने इतरांना गोळीबार करण्यास सांगितले होते. त्यामुळे सुपारी देणारा मुख्य सुत्रधार अद्याप अंधारात असून, अंकुश शेवाळे किंवा मयुर बेद यांच्याकडून सुपारी देणाऱ्याचे नाव उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेतील मुख्य संशयित मयुर बेद हा अद्याप फरार आहे.

अंकुशने पैसे पुरवले

पोलिस तपासात गोळीबार झाल्यापासून मयुर बेद फरार आहे. तो फरार असल्यापासून संशयित अंकुश शेवाळे याने मयुरला सुमारे दोन लाख रुपये पुरवल्याचे समोर आले आहे. त्यासाठी त्याने संशयित प्रसाद शिंदे मार्फत हे पैसे मयुरला दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अंकुश याने कोणाच्या सांगण्यावरून फरार असलेल्या मयुरला पैसे पुरवले याचा शोध पोलिस घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT