नाशिक : चांदवड-मनमाड रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (स्टेट एक्साईज) शासकीय वाहनास धडक देत वाहन चालकाचा खून करून पसार झालेल्या मद्यतस्कर टोळीतील चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दमण येथून अटक केली. संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधुसिंग मारवाडी (३३, रा. दमण, मुळ रा. राजस्थान) असे पकडलेल्या क्रेटा वाहनचालकाचे नाव आहे.
एक्साईज विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने ७ जुलैला सापळा रचून मद्यतस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील क्रेटा वाहनचालकाने पथकास हुलकावणी देत पळ काढला. त्यामुळे पथकाने शासकीय व खासगी वाहनांमधून क्रेटा वाहनाचा पाठलाग केला. मात्र क्रेटा वाहनचालकाने शासकीय वाहनास धडक देत त्यावरील चालक अंमलदार कैलास गेणू कसबे हे ठार झाले तर दोन अंमलदार जखमी झाले होते. घटनेनंतर क्रेटा वाहन चालक त्याच्या साथीदारासह फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखा मुख्य संशयित मारवाडी याला पकडण्यासाठी दमन, दादर-नगर हवेली या परिसरात शोध घेत होते. अखेर खबर मिळताच दमनमधून संशयित मारवाडी यास ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, हवालदार सचिन देसले, किशोर कराटे, धनंजय शिलावटे, प्रकाश कासार, मेघराज जाधव, नितीन डावखर, मनोज सानप, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
ग्रामीण पोलिसांनी देवीश पटेल, अशपाक अली शेख, राहुल सहानी, शोएब अन्सारी, भावेशकुमार प्रजापती यांना अटक झाली असून आता संजय मारवाडी यालाही पकडल्याने आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. परराज्यातील मद्य तस्करांचे पाळेमुळे शोधण्यात पोलिसांना यश येत आहे.