नाशिक : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेत १७ कोटी ७४ लाख ७५ हजार १५७ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आ. अपूर्व हिरे, तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सरकारवाडा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात योगिता अपूर्व हिरे, स्मिता प्रशांत हिरे, राजेश शशिकांत शिंदे, संतोष वामन घुले तसेच बँकेचे इतर पदाधिकारी आरोपी करण्यात आले आहे.
रीना संतोष गोसावी यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. २०२१ पासून सदर प्रकरण सुरु होते. अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे या बँकेच्या अध्यक्षा होत्या. हिरे कुटुंबीय 'महात्मा गांधी विद्यामंदिर,आदिवासी सेवा समिती' या शैक्षणिक संस्थेतही पदाधिकारी होते. या नात्याने त्यांनी बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. फिर्यादीसह सहसंस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावर, कोणतेही अतिरिक्त तारण न घेता, त्यांच्या नकळत व बनावट सह्यांच्या आधारे कर्ज प्रकरणे तयार करण्यात आली. ही कर्जे विविध गैरमार्गाने मंजूर करून ती रक्कम हिरे कुटुंबीय व त्यांच्या व्यावसायिक फर्मांच्या खात्यात वर्ग केली. त्यानंतर संबंधितांनी सेल्फ-चेकच्या माध्यमातून ही रक्कम स्वतःकडे वळवली. अशा प्रकारे एकूण १७ कोटी ७४ लाख ७५ हजार १५७ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवशी गुन्हा दाखल
विशेष म्हणजे, माजी आ. अपूर्व हिरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होण्याच्या एक दिवस आधीच त्यांच्या विरोधात सदर गुन्हा दाखल करण्यात आला. याआधीही त्यांच्या विरोधात व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह बँकेतून बनावट कर्ज वाटपासंदर्भात तसेच १० लाख रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
संबंधित गुन्हे हे, पूर्णपणे खोटे व राजकीय द्वेषातून नोंदवण्यात आलेले आहे. हे संबंधितांचे वैयक्तिक कर्ज असून गुन्ह्यांमधील कुठल्याही आर्थिक गैर व्यवहारात आमचा किंवा संस्थेचा संबंध नाही, पोलिसांनी सर्व बँक अकाउंट योग्यरित्या तपासणे गरजेचे आहे. संबंधित हे संस्थेत नीट काम करत नव्हते. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते गैरहजर असल्याने त्याच अनुषंगाने संस्थेकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याच वैयक्तिक द्वेषापोटी हे खोटे गुन्हे नोंदवले आहेत.डॉ. अपूर्व हिरे. समन्वयक, महात्मा गांधी विद्या मंदिर