ठळक मुद्दे
शहरात हायप्रोफाईल फसवणुक
मुंबईतील महिलेकडून नाशिकमधील नामांकित व्यावसायिकाला एक कोटीचा गंडा
भारत सरकारचा बनावट ई-स्टॅम्प पेपर वापरून गंडा घातला
इंदिरानगर (नाशिक) : शहरात एका हायप्रोफाईल फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून मुंबईतील एका महिलेने नाशिकमधील एका नामांकित व्यावसायिकाला तब्बल एक कोटी एक लाख रुपयांना गंडवल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील एका गेस्टहाऊसची मालकी नसतानाही ती आपलीच असल्याचे भासवून आणि भारत सरकारचा बनावट ई-स्टॅम्प पेपर वापरून हा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी धीरज भवरलाल काबरा (५२, रा. श्रीजी सिनर्जी अपार्टमेंट,गोविंदनगर) हे प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. त्यांची ओळख मुंबईतील भांडुप येथे राहणाऱ्या अरुणा श्रीकृष्ण मोरे या महिलेशी झाली. अरुणा मोरे हिने उत्तराखंड राज्यातील रूडकी गावात 'साबरी रजवी गेस्ट हाऊस' नावाची मोठी प्रॉपर्टी आपल्या मालकीची असल्याचे काबरा यांना सांगितले. ही प्रॉपर्टी विकायची असल्याचे सांगून तिने काबरा यांच्यासमोर चार कोटी ६५ लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला.
आरोपी अरुणा मोरे हिने आपल्या बोलण्याने आणि बनावट कागदपत्रांआधारे काबरा यांचा विश्वास संपादन केला. तिने भारत सरकारची छापील मोहोर असलेला हुबेहूब बनावट ई-स्टॅम्प पेपर तयार करून त्यावर विसार पावती बनवली. हा व्यवहार पक्का करण्यासाठी ऑगस्ट २०१९ ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील हॉटेल तपस्वी येथे बैठका झाल्या. याच हॉटेलमध्ये काबरा यांनी अरुणा मोरेला व्यवहारापोटी सुरुवातीला १५ लाख रुपये रोख दिले. यानंतर अरुणा मोरे हिने वेळोवेळी काबरा यांच्याकडून आणखी ८६ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. असे एकूण १ कोटी एक लाख रुपये स्वीकारल्यानंतर तिने बनावट नोटरी कागदपत्रे तयार करून काबरा यांना दिली. मात्र बराच काळ उलटूनही पुढील प्रक्रिया होत नसल्याने काबरा यांना संशय आला. त्यांनी जेव्हा प्रॉपर्टीची खातरजमा केली, तेव्हा ती प्रॉपर्टी अरुणा मोरे हिच्या मालकीची नसल्याचे सत्य समोर आले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धीरज काबरा यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अरुणा श्रीकृष्ण मोरे हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.