नाशिक : शासकीय ठेकेदार सुदर्शन कारभारी सांगळे यांच्या जीवनयात्रा संपवल्याप्रकरणी संशयित नवनाथ परसराम टिळे यास मुंबई येथून गुन्हे शाखा युनिट- १ च्या पथकाने ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करुन चार दिवस मुंबईत तळ ठोकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ठेकेदार सुदर्शन सांगळे (५१ए रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी काही दिवसांपूर्वीच राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. त्यांनी मृत्यूपुर्वी लिहलेल्या चिट्ठीत संशयित नवनाथ परसराम टिळे व राम किसनराव शिंदे यांनी आर्थिक फसवणुक केल्याने जीवनयात्रा संपवल्याबाबत नमुद केले होते. त्यावरून संशयिताविरूध्द जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांच्या शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शोध सुरू असतानाच गुन्हेशाखा युनिट- १ पथकातील हवालदार महेश साळुंके, अंमलदार राहुल पालखेडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच हवालदार प्रविण वाघमारे, विशाल देवरे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाल्याने त्यांनी संशयित नवनाथ टिळे याच्या अटकेसाठी डॉ. अंचल मुदगल यांना माहिती देत पथक संशयिताच्या शोधासाठी मुंबईला रवाना केले.
या पथकाने मुंबई सेंन्ट्रल परिसरात चार दिवस वेशांतर करून शोध घेतला असता संशयित हा मुंबई सेंन्ट्रल रेल्वे स्टेशन येणार असल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी वेशांतर केलेल्या पोलिस पथकाने रविवारी (दि. २३) दुपारच्या सुमारास टिळे यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गुन्ह्याची केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, पथकाने टिळे यास पथकाने पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, महेश साळुंके, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांनी केली.