इंदिरानगर : वडाळा गावात गरीब नवाज कॉलनीतील गोपाळवाडी मुख्य रस्त्याच्या मागे टवाळखोरांनी रविवारी (दि. १३) मध्यरात्री रात्री 1.30 च्या सुमारास कार आणि दुचाकी जाळल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनी येथील व इतर ठिकाणचे चार ते पाच टवाळखोर वडाळा गावात रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास घुसले. त्यांच्याविरुद्ध येथील एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या मुद्द्यावरून टवाळखोरांनी येथील नईन शेख यांचे चारचाकी वाहन (एमएच 02, ईएच 4955) व अन्य दुचाकीला आग लावली. यात दुचाकी पूर्णपणे भस्मसात झाली. कारचा अक्षरश: सांगाडा उरला. आग लागल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी ती विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. म्हाडा कॉलनी व इतर ठिकाणच्या चार ते पाच जणांनी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार केल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. याआधीही ही मुले येऊन येथील लहान मुलांना मारहाण करत होते. अशा प्रकारच्या तक्रारी केल्यानेच त्यांनी हा प्रकार केल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. आमच्यावर तक्रारी करून कारवाई झाल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नसल्याचा दम या टवाळकोरांनी दिल्याचे येथील महिला व पुरुषांनी सांगितले. या संदर्भात इंदिरानगर पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदविण्यात आली आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक चौकशी करत आहे.
वडाळा गाव व परिसरामध्ये विविध प्रकारचे गुन्हे घडत असल्याने वडाळा गाव हॉटस्पॉटवर आले आहे. विविध कारणांनी गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित गुन्हे व अनेक तक्रारी येथून येत असल्याने पोलिसांसाठी हा भाग अधिक संवेदनशील होत चालल्याचे दिसून येत आहे.