नाशिक : शहरात गत महिनाभरात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी १४ गुन्हे दाखल झाले असून, तीन खुनांच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे मारहाणीचे ३० गुन्हे दाखल असून, वाहनांची तोडफोड, खंडणीचे प्रकारही उघडकीस आल्याने रस्त्यावरील गुन्हे वाढल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
मालेगाव स्टॅण्ड परिसरात गोळीबार करून गुन्हेगारांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसेच ज्या गुन्हेगारावर गोळीबार झाला, त्यानेही गोळीबार करणाऱ्यांविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणांवरून एकमेकांवर हल्ले करणे, मारहाण करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यासाठी गुन्हेगारांकडून कोयते, धारदार शस्त्रांचा सर्रास वापर होत आहे. यात अल्पवयीन मुलांचाही सक्रिय सहभाग हा चिंतेचा विषय झाला आहे.
दि. १५ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये खुनाचे तीन गुन्हे दाखल आहेत, तर प्राणघातक हल्ले केल्याप्रकरणी १४ व मारहाणीचे ३० गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे सार्वजनिक ठिकाणी व वर्दळीच्या ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना कसलाच धाक नसल्याचे अधोरेखित होते. पंडित कॉलनी येथे सफाई कर्मचाऱ्याचा खून केल्यानंतर मारेकऱ्याने सोशल मीडियावर स्टेट्स ठेवत खुनाची अप्रत्यक्षरीत्या कबुली दिली तसेच सातपूर येथेही युवकावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर काही वेळाने त्याच परिसरात वाहन, घरावर दगडफेक करीत तोडफोडीचा प्रकार घडला होता. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिस कारवाईचा धाक राहिला नसल्याची चर्चा आहे.
पंचवटी ३
अंबड १
इंदिरानगर २ (१)
गंगापूर १ (१)
उपनगर २
सरकारवाडा (१)
सातपूर १
भद्रकाली २
मुंबई नाका १
शहरात गुन्हेगारांकडून वाहनांसह घराची तोडफोड किंवा जाळपोळीचे प्रकारही घडले आहेत. त्याचप्रमाणे विनाकारण वाहनांची ताेडफोड करून सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवण्याचेही प्रकार घडले. काही गुन्हेगारांनी व्यावसायिकांना धमकावून, मारहाण करीत त्यांच्याकडून पैसे हिसकावत खंडणी मागितल्याचे गुन्हे समोर आले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांकडून वैयक्तित वादासोबतच सर्वसामान्यांना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत.