पंचवटी : पेठ रोडवरील राऊ हॉटेल जवळ गोवंश तस्करीच्या संशयातून म्हशींची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना रोखून दुचाकीने आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत घडली असून या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून एक गंभीर आहे. याबाबत पोलीसांनी अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथून टेम्पो व पिक अपमधून म्हशींची वडाळा गावाकडे वाहतूक केली जात होती. या वाहनातील म्हशी वडाळा गावातील गोठ्यात पोहच केल्या जाणार होत्या. सोमवारी (दि.९) रात्री १० वाजेच्या सुमारास पेठ रोडवरील जवळील राऊ हॉटेल सिग्नलच्या अलीकडे दुचाकींवर ३० ते ३५ लोकांचा जमाव आला. त्यांनी ही दोन्ही वाहने रोखत वाहनांमध्ये असलेले फहाद चौधरी (रा.बागवानपुरा), हमीद शेख (रा.वडाळा), वाजीद शेख (रा.नाईकवाडीपुरा) या तिघांना खाली ओढून जबर मारहाण केली. या मारहाणीत यातील फहाद हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
पोलिसांची वाहने येत असल्याचे बघून हल्लेखोर दुचाकींनी फरार झाले. जखमींना पोलिसांनी तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.