वणी : दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी हरिदास आंबादास शेखरे (वय १६, रा. गळवड, ता. सुरगाणा) याने वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवल्याची नोंद असून, या प्रकरणी संस्थाचालकासह पाच जणांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याला विविध कामे सांगून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत विद्यार्थी आदिवासी समाजातील असल्याने या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्याची मागणीही कुटुंबीयांसह सामाजिक संघटनांनी केली आहे.
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, हरिदास हा जोपुळ आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहून दहावीचे शिक्षण घेत होता. तो अधूनमधून कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत असे. संस्थाचालक जयराम उगले ऊर्फ पाटील सर यांच्याकडून त्याला शिक्षणाव्यतिरिक्त शेतातील खत टाकणे, बारदाणे देणे, दळण आणणे आदी कामे सांगितली जात असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले होते. या कामांमुळे मानसिक त्रास होत असल्याचेही त्याने सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
कुटुंबीयांनी त्याची समजूत काढून शिक्षणाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता हरिदासची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. त्याला पिंपळगाव बसवंत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. पोलिसांच्या नोंदीनुसार, त्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे नमूद आहे.
मृतदेहाची पाहणी केली असता उजव्या पायाच्या पंजावरील बोटांना जखमा तसेच मानेवर दोरीच्या वळासारखी गोलाकार निशाणी दिसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जीवन संपवण्यापूर्वी हरिदासला मानसिक अथवा शारीरिक त्रास देण्यात आला होता का, त्याला जीवन संपवण्यास प्रवृत्त करणारी परिस्थिती निर्माण झाली होती का, याबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संस्थाचालक जयराम उगले ऊर्फ पाटील सर, वर्गशिक्षिका रौंदके मॅडम, मुख्याध्यापिका साखरे मॅडम, अधीक्षक माळी आणि लिपिक भदाणे रा जोपुळ येथील आश्रम शाळा ता.दिंडोरी (नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आश्रमशाळेतील कथित मानसिक त्रासाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मृत विद्यार्थी आदिवासी समाजातील असल्याचे सांगत ॲट्रॉसिटी कायद्याचे कलम लावण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीतील आरोप आणि घटनेची परिस्थिती तपासून संबंधित कायद्याच्या तरतुदी लागू होत असल्यास त्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीय व सामाजिक संघटनांनी केली आहे. आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे यांनीही कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणाचा तपास वणी पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. हरिदासच्या आत्महत्येमागील नेमकी कारणे, त्याला कथित मानसिक त्रास देण्यात आला होता का आणि आरोपींची भूमिका काय होती, याचा तपास करण्यात येत आहे. फिर्यादीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे बाकी असून, तपासाच्या निष्कर्षाकडे कुटुंबीयांसह परिसराचे लक्ष लागले आहे