Nashik Crime | मयत जब्बार तांबोळी 
नाशिक

Nashik Crime | देवळा येथे पोलिस असल्याचे भासवून 11 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, मारहाणीत व्यापाऱ्याचा मृत्‍यू

पोलिसांनी तीन आरोपींना घेतले ताब्यात: अस्वस्थ असल्याचे सांगूनही आरोपींनी केली मारहाण

पुढारी वृत्तसेवा

देवळा ; पोलीस उपमहानिरीक्षक विशेष पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करून आलेल्या तीन जणांनी पीक अप वाहन अडवून चालक व त्या सोबत असलेल्या जब्बार चांदभाई तांबोळी (५५) यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली .

आरोपींनी केलेल्या मारहाणीत तांबोळी यांचा मृत्‍य झाला, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि ११ रोजी मयत जब्बार चांदभाई तांबोळी (५५) याने चांदवड येथील इलियास बागवान यांचे पीकअप वाहन क्र एम एच 15 एच एच 8661 घेऊन गुजरात येथे माल घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर संबंधित वाहनात माल भरून पुन्हा देवळा येथे येत असताना कळवण तालुक्यातील एकलहरे येथून काळ्या रंगाच्याा स्कॉर्पीओ गाडीने त्यांचा पाठलाग केला. रात्री 12 वाजेच्या सुमारास भऊर फाट्याजवळ पीकअप वाहनास गाडी आडवी लावून चालक इलियास बागवान व जब्बार तांबोळी यांना बळजबरीने खाली उतरून गाडीत बसविले. आम्ही आयजी स्कॉडची माणसे असून, तूम्ही गुटख्याची वाहतूक करतात जर तुम्हाला केस करायची नसेल तर आम्हाला 25 लाख रुपये द्या अशी खंडणीची मागणी केली. तसेच त्यापैकी एकाने पीक अप वाहन घेऊन पोबारा केला. यात जब्बार तांबोळी यांनी 11 लाख रुपये देण्याचे कबूल केले.

जब्बार यांचा मुलगा साहिल तांबोळी यास पैसे घेऊन येण्यास सांगितले . त्या कालावधीत जब्बार तांबोळी यांची तब्बेत बिघडल्याने ते अस्वस्थ झाले. मात्र आरोपीनी त्यांना दमबाजी करत मारहाण केली. त्यामुळे जब्बार तांबोळी बेशुद्ध होऊन पडले. हे पाहून संशयित त्यांची गाडी घेऊन फरार झाले. त्यांचा मुलगा साहिल तसेच पिंपळगावचे सरपंच नदिश थोरात, महेंद्र पाटील व अमोल पाटील हे चौघे पैसे घेऊन तेथे गेले असता जब्बार यास जमिनीवर पडलेलले होते. त्यांना सटाणा येथे उपचारासाठी घेऊन गेले. डॉक्टरानी त्यांना तपासून मयत घोषित केले .

त्यानंतर फिर्यादी इलिसाय सुलतान बागवान वय 44 रा चांदवड यांच्या फिर्यादी वरून संशयित आरोपी विलास जगताप ,मुहम्मद शफीक मुहंमद रफिक रा मालेगाव, महेश भामरे रा तांदूळ वाडी ता सटाणा या तिघांना जब्बार याच्या मरणास कारणीभूत ठरल्याने ताब्यात घेतले आहे.

सदर संशयित हे गोरक्षक असल्याची माहिती मिळत असून, गोरक्षणच्या नावाखाली रात्री अपरात्री वाहनाचा पाठलाग करून वाहने अडवून चालकांना दमबाजी करून त्यांच्या कडून खंडणी उकळत असतात . तसेच गोरक्षणाच्या नावाखाली गोरख धंदे करत असल्याची चर्चा आहे. जब्बार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुली असा परिवार आहे . जब्बार यांच्या एका मुलीचे येत्या 7 मे रोजी लग्न होते . त्यांच्या निधनाने देवळा शहरासह पिंपळ गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

या घटने बाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील ,पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे,सुभाष चव्हाण, नितीन बाहारते , राहुल शिरसाठ तपास करीत आहेत .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT