देवळा : येथील जनुभाऊ आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी गुरुवारी (दि.१९) संस्थापक अध्यक्षांसह सहकार अधिकाऱ्याला संस्था कार्यालयात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. संबंधित ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप त्यांना पैसे परत मिळत नसल्याने हा प्रकार केला. सायंकाळी उशिरा साडे सहा वाजता सहकार अधिकारी वसंत गवळी यांनी वसुली करून तुमचे पैसे परत केले जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले .
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा येथे जनुभाऊ आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची १९९४ साली स्थापना झाली असून, या संस्थेत अनेक ठेवीदारांनी आपले पैसे गुंतवले आहेत. कर्ज वसुली अभावी ही संस्था अवसायनात निघाल्याने गेल्या बारा वर्षांपासून ही संस्था बंद आहे. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. संबंधित ठेवीदारांनी सहकार विभागाकडे आमच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप त्यांना पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गुरुवारी (दि. १९) सहकार अधिकरी वसंत गवळी आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय आहेर हे दुपारी तीन वाजेताच्या सुमारास संस्था कार्यालयात आले होते. यावेळी संतप्त ठेवीदारांनी त्यांना कार्यालयात डांबून ठेवत बाहेरून कुलूप लावून घेतल्याचा खळबळजणक प्रकार घडला. तब्बल अडीच तासानंतर सहकार अधिकारी वसंत गवळी यांनी ठेवीदारांना वसुली करून आपले पैसे लवकरात लवकर देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कार्यालयाचे कुलूप उघडून त्यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी ठेवीदार देवाजी निकम, सोमनाथ वराडे, महेंद्र आहेर आदींसह सचिव शरद आहेर, पुंडलिक आहेर, विजय शिंदे , डॉ राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते .