

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
डोंबिवली खोनी रोडवरील एका उच्चभृ सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये साप, सरडे विविध प्रकारचे कासव आणि चिंपांझी माकड यासारखे प्राणी डांबून ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई ठाण्याच्या वन विभागाच्या पथकाला ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने या फ्लॅटवर छापा टाकत या प्राण्यांची सुटका केली. हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये राहणारे नागरिक घरात आणि मोठमोठ्या हॉटेलात अशा प्रकारचे प्राणी अंधश्रद्धेपोटी पाळतात. या प्राण्याची लाखो करोडो रुपयात खरेदी केली जात असल्यानेच या प्राण्याची तस्करी करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फैजान खान या संशयित आरोपी विरोधात वनविभागाच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून फैजान फरार आहे.
संशयित फैजान याने पलावा सिटीमधील सवरना इमारतीतीतील बी विंग मध्ये राहणाऱ्या चेन्नीथा यांच्याकडून भाड्याने घर घेतले होते. या घराचा वापर वन्यप्राण्यांची तस्करी करण्यासाठी केला जात होता, मात्र याबाबत कुणालाच माहिती नव्हती. याची माहिती मुंबई व ठाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा रचला. या फ्लॅट मध्ये छापा टाकला असता डांबून ठेवलेले परदेशी प्राणी पाहून त्यांना धक्का बसला. सोनेरी, पांढऱ्या, हिरव्या यासारख्या विविध रंगाचे मोठमोठे साप बॉक्स मध्ये भरून ठेवल्याचे आढळून आले. तर वेगवेगळ्या प्रकारचे ७ ते ८ कासव, एग्वाणा सरडा, चिंपांझी माकड देखील घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आणि बाथरूममध्ये पिंजऱ्यात कैद करून ठेवण्यात आल्याचे दिसून आले.