Construction Pudhari
नाशिक

Construction Material Price Hike Nashik| बांधकाम साहित्य दरात वाढ : नाशिकमध्ये गृहस्वप्नपूर्ती झाली अवघड

Nashik Real Estate Crisis 2026 - कॉलेजरोड 10; गोविंदनगरला 7 हजार दर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

सेकंड होम अन् बजेट फ्लॅट यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये १२ ते १५ लाखांत मिळणाऱ्या परवडणाऱ्या फ्लॅटची किंमत आता २० लाखांच्या पुढे गेली आहे. बांधकाम साहित्याच्या दरात झालेली वाढ अन् प्लॉटच्या वाढलेल्या किमतींमुळे गृहस्वप्न महाग झाले आहे. शहराच्या चोहोबाजूने फ्लॅट अन् प्लॉटचे दर गगनाला भिडले असून, सर्वसामान्यांना आता घर घेण्यासाठी बजेट वाढविणे अपरिहार्य ठरत आहे. तर विकासकांकडून जागतिक घडामोडी बघता, आताच गृहस्वप्न साकार करण्याची संधी असल्याचे सांगितले जात आहे.

इराण-अमेरिका युद्धाचा फटका इतर

क्षेत्राप्रमाणेच बांधकाम क्षेत्रालादेखील बसला आहे. स्टील, सीमेंट, रंग, लोखंड, टाइल्स या मूलभूत बांधकाम साहित्याच्या किमतीत तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय टाइल्स, रग, प्लंम्बिग साहित्य आणि इलेक्ट्रिकल साहित्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ व मजुरीतील वाढीचा परिणाम घरांच्या किमतीवर झाला आहे. नाशिकला परवडणाऱ्या घरांसाठी ओळखले जाते. मुंबई-पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणात असतानाही या दोन शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये घरांच्या किमती खूपच कमी आहेत. त्यामुळेच मुंबई, ठाणे, पुण्यासह धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांचा सेकंड होमसाठी नाशिककडे मोठा कल आहे.

या भागांत गृहस्वप्न सर्वाधिक महाग

शहराचा प्राइम परिसर असलेल्या कॉलेजरोड, गंगापूर रोडला गृहस्वप्न साकारणे पूर्वीपासूनच महाग असून, आता त्यात आणखी भर पडली आहे. कॉलेजरोडला फ्लॅटचा दर १० हजार प्रतिस्क्वेअर फुटावर गेला आहे. तर गंगापूर रोड ८ हजार प्रतिस्क्वेअर फुटावर आहे. याशिवाय झपाट्याने वाढणाऱ्या गोविंदनगरला दर ७ हजारांवर आला आहे. सिरीन मेडोजमध्ये किमती चढ्या आहेत. याशिवाय इंदिरानगरमधील दरांनी पाच हजारांचा आकडा पार केला आहे. शहराच्या चोहोबाजूने असलेल्या सातपूर, पंचवटी, पाथर्डी फाटा, मेरी-म्हसरूळ, मखमलाबाद, नाशिकरोड, आडगाव या भागातील दर चार हजारांच्या पुढे गेले आहेत. देवळाली फाटा परिसरात फ्लॅटचा दर सर्वात कमी म्हणजे तीन हजारांच्या आसपास आहे.

रो-हाउस कोटीच्या जवळ

रो-हाउस प्रकल्प उभारणीचे प्रमाण कमी असून, रो-हाउस घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. रो- हाउसच्या किमती सरासरी एक कोटीपर्यंत पोहोचल्या आहेत. शहराच्या सातपूर, पंचवटी, पाथर्डी, आडगाव, नाशिकरोड या भागात रो-हाउस घेण्याचा विचार केल्यास, ८० ते ९० लाखांपर्यंत किमती आहेत. प्लॉटच्या किमतीदेखील ३० हजार प्रतिवारावर गेल्या आहेत.

बांधकाम साहित्याबरोबरच प्लॉटच्या किमतीत वाढ झाली आहे.शहरात मागणीच्या तुलनेत फ्लॅट कमी असल्यानेदेखील त्याचा थेट परिणाम किमती वाढीवर होत आहे. मात्र, अशातही इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये घरांच्या किमती स्थिर असल्याने, गृहस्वप्नपूर्तीची हीच संधी आहे.

- सुनील गवादे, माजी अध्यक्ष, नरेडको

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT