नाशिक : जळगाव जिल्ह्यातील बांभोरी (ता. धरणगाव) येथील ग्रामपंचायत सदस्याला चार अपत्ये असल्याची माहिती लपवून ठेवल्याबाबत त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील बांभोरी प्र. चा. येथे 2020मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य म्हणून भिकन नन्नावरे निवडून आले होते. त्यावेळी त्यांना चार अपत्ये असूनसुद्धा त्यांनी ही बाब लपवली होती. याबाबत गावातील राकेश नन्नावरे यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दिला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळाला होता. या आदेशाविरुद्ध अर्जदार यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते.
विभागीय आयुक्त यांनी या प्रकरणात फेरचौकशीचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध अर्जदार यांनी उच्च न्यायलयात दाद मागितली होती. न्यायालयाने विभागीय आयुक्त यांना या प्रकरणात फेरचौकशी न करता अंतिम आदेश पारीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी सुनावण्या घेऊन अर्जदार यांचे अपील मंजूर केले आणि बांभोरी प्र. चा. येथील ग्रामपंचायत सदस्य भिकन श्यामराव नन्नावरे यांना चार अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना अपात्र घोषित केले. अर्जदार राकेश नन्नावरे यांच्यातर्फे ॲड. गणेश सावळे, ॲड. सागर आंधळे यांनी काम पाहिले.