

नाशिक : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 193 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरअखेर संपुष्टात आल्याने 21 जानेवारीनंतर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी वेगाने सुरू झाली असून, सरंपच आरक्षणाच्या सोडतीसंदर्भातील बैठक 21 जानेवारीला घेण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढल्याने जानेवारीअखेरीस निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 13 तालुक्यांतील 193 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने 2025 च्या सुरुवातीलाच निवडणुका होतील, असे चित्र आहे. राज्य निवडणुका आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने 13 तालुक्यांतील गावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचनांची कार्यवाही पूर्ण केली आहे. मात्र, गावनिहाय सरपंच सोडतीचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्र वगळता खुल्या वर्गातील 1 हजार 452 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाचे वाटप करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील 196 पैकी पेसा क्षेत्र वगळता 106 ग्रामपंचायतींकरीता आरक्षणाचे वाटप केले आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी 8, अनुसूचित जमातीच्या 13, ओबीसींसाठी 29 जागा राखीव असतील. तर 56 सरपंचांची निवड खुल्या प्रवर्गातून करण्यात येणार आहे. यानंतर कुठल्या गावात सरपंचांची पदे राखीव, तर कुठली पदे खुल्या प्रवर्गासाठी सुटणार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी 21 जानेवारीला बैठक होणार आहे. यासंदर्भात शासनाने आदेश जारी केल्याने त्यानंतर निवडणुकांचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.
इगतपुरी -65
निफाड -32
बागलाण -29
त्र्यंबकेश्वर -17
कळवण -14
मालेगाव -9
नांदगाव -8
येवला -8
नाशिक -7
चांदवड -1
दिंडोरी -1
देवळा -1
पेठ -1
एकूण -193
जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना जाहीर करण्यासाठी मागविलेल्या हरकतींवर हरकत घेण्यासाठी दिलेला कालावधी सोमवारी (दि. 6) संपला. मात्र, या कालावधीत सावरपाडाव्यतिरिक्त कोणत्याही ग्रामपंचायतीत हरकत दाखल झालेली नसल्याने लवकरच प्रभागरचना जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये त्र्यंबकमधील खरशेत, बागलाणमधील अलियाबाद, देवळा येथील वरवंडी, मालेगावमधील सावतावाडी, वडनेर, काष्टी तसेच दिंडोरी येथील सावरपाडा, ननाशी अणि रवळगाव येथील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.