Army Aviation Training School Convocation 
नाशिक

Army Aviation Training School Convocation | नाशिकच्या भूमीतून आकाशरक्षकांची हवाई झेप

Army Aviation Training School Convocation | वैमानिकांचा दीक्षांत सोहळा : कॅट्समधून वायुदलाचे नवे शिलेदार सज्ज

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

हेलिकॉप्टर, ड्रोन आणि मानवरहित विमानप्रणालीचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्याच्या हवाई सामर्थात भर घालणाऱ्या नव्या पिढीतील वैमानिकांचा दीक्षांत सोहळा नाशिक येथील लढाऊ लष्करी विमानचालन प्रशिक्षण शाळेत (कॅट्स) उत्साहात पार पडला.

आधुनिक युद्धतंत्रज्ञानाशी सुसंगत प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेच्या कार्यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नाशिक येथील लढाऊ लष्करी विमानचालन प्रशिक्षण शाळेने (कॅटस) गांधीनगर येथे मंगळवारी (दि.२) भव्य दीक्षांत संचलन आयोजित करून विविध विमानचालन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदवीदान करण्यात आली.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आर्मी ट्रेनिंग कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांनी भूषविले. लढाऊ वैमानिक, हेलिकॉप्टर प्रशिक्षक, आरपीएएस (मानवरहित विमानप्रणाली) प्रशिक्षक तसेच संयुक्त वैमानिक व निरीक्षक अभ्यासक्रमातील अधिकाऱ्यांनी यावेळी प्रशिक्षण पूर्ण केले.

सैद्धांतिक शिक्षण, प्रगत सिम्युलेशन आणि प्रत्यक्ष उड्डाण सराव अशा कठोर प्रशिक्षण प्रक्रियेनंतर हे अधिकारी पात्र सोहळ्यातील 'एव्हिएशन शक्ती' या विशेष प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली, हेलिकॉप्टर, ड्रोन, आरपीएएस, तोफरखाना, पायदळ आणि चिलखती वाहने यांचा समन्वित वापर सादर करून आधुनिक युद्धातील भारतीय सैन्याची तयारी दर्शविण्यात आली.

यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल शर्मा यांनी भविष्यातील युद्धांमध्ये मानवरहित तंत्रज्ञान, अत्याधुनिक टेहळणी व्यवस्था आणि प्रशिक्षित वैमानिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले. नव्या वैमानिकांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना उच्च व्यावसायिकता आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रेमाची भरारीही ठरली संस्मरणीय !

दीक्षांत सोहळ्यानंतर एक भावनिक आणि आनंददायी प्रसंग उपस्थितांच्या मनात घर करून गेला. प्रशिक्षण पूर्ण केलेला वैमानिक भारत भारद्वाज यांनी हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून आपली प्रेयसी आरुषी हिला अंगठी घालत लग्राची मागणी घातली. आरुषीने होकार देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या क्षणाचे स्वागत केले. देशसेवेच्या स्वप्नांसह प्रेमाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणारा हा अनोखा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

नाशिक लष्करी विमानचालनाचे केंद्र

नाशिकमधील लढाऊ लष्करी विमानचालन प्रशिक्षण शाळा (केंट्स) देशातील अत्यंत महत्त्वाच्या संरक्षण प्रशिक्षण संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. हेलिकॉप्टर वैमानिक, प्रशिक्षक आणि मानवरहित विमानप्रणाली संचालक तयार करण्याचे काम ही संस्था करत आहे. आधुनिक प्रशिक्षण सुविधा, सिम्युलेटर आणि अत्याधुनिक अभ्यासक्रमांमुळे देशभरातील अधिकारी येथे प्रशिक्षणासाठी येतात. भारतीय सैन्याच्या भविष्यातील हवाई क्षमतेला दिशा देणारे अनेक वैमानिक नाशिकमध्ये घडत असल्याने शहराची ओळख राष्ट्रीय संरक्षण क्षेत्रात अधिक भक्कम होत आहे. नाशिककरांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT