Washim news: लग्नमंडपातून थेट परीक्षेला हजेरी; नववधू वैष्णवी काळेने दिले शिक्षणाला प्राधान्य

आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशीही 'शिक्षण प्रथम' चा आदर्श
Washim news
Washim news: लग्नमंडपातून थेट परीक्षेला हजेरी; नववधू वैष्णवी काळेने दिले शिक्षणाला प्राधान्यPudhari
Published on
Updated on

वाशीम : वाशीम तालुक्यातील भटउमारा येथील एक प्रेरणादायी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. समाजकार्याचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आणि नववधू वैष्णवी संतोष काळे हिने आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवशी लग्नाच्या दिवशीही शिक्षणाला प्राधान्य देत थेट लग्नमंडपातून परीक्षेला हजेरी लावून एक आदर्श निर्माण केला आहे.

दि. 28 एप्रिल 2026 रोजी वैष्णवीचा विवाह ज्ञानेश्वर राजू चौधरी (रा. भटउमारा) यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नाचे विधी सुरू असतानाच, ठरलेल्या वेळेत परीक्षा देणे आवश्यक असल्याने वैष्णवीने कोणतीही तडजोड न करता मंडपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेतच ती वाशीम येथील राजस्थान महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि दुपारी 2 ते 5 या वेळेत तिने परीक्षा दिली.

पारंपरिक वेशात नववधू परीक्षा देताना पाहून परीक्षा केंद्रातील विद्यार्थी आणि शिक्षकही आश्चर्यचकित झाले. तिच्या या जिद्दीचे आणि शिक्षणावरील निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी या घटनेला “शिक्षण प्रथम” या विचाराचे उत्तम उदाहरण म्हणून गौरवले आहे. वैष्णवीच्या या कृतीमुळे समाजासमोर एक सकारात्मक संदेश गेला असून, विशेषतः महिलांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाला प्राधान्य द्यावे, हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे. आजही अनेक ठिकाणी मुलींच्या शिक्षणाकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते; अशा परिस्थितीत वैष्णवीसारख्या तरुणींची उदाहरणे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरत आहेत.

यावेळी वैष्णवी म्हणाली, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आणि राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा मानस असल्याचे तिने सांगितले. वैष्णवी ही वाशीम येथील श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाची बी.ए.एस.डब्ल्यू. (भाग-3) ची विद्यार्थिनी असून, तिने समाजकार्याच्या शिक्षणाला प्राधान्य देत लग्नाच्या दिवशीही परीक्षा दिली. तिच्या या निर्णयामुळे शिक्षणाचे महत्त्व, निर्णयक्षमता आणि जिद्द अधोरेखित झाली आहे.

स्थानिक नागरिक, शिक्षक तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी वैष्णवीच्या या निर्णयाचे मनापासून कौतुक केले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या कुटुंबीयांनी आई-वडील, पती, सासू-सासरे व नातेवाईकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे भटउमारा गावाचे नावही अभिमानाने घेतले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news