Earthquake 
नाशिक

Nashik Earthquake | भूकंपाच्या पार्श्वभूमीवर 'रेड मार्क' इमारतींचे फेरसर्व्हेक्षण

Nashik Earthquake | जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून जाणवणाऱ्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा


जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून जाणवणाऱ्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी यापूर्वी 'रेड मार्क' केलेल्या तसेच जीर्ण आणि धोकादायक इमारतींचे फेरसर्व्हेक्षणाचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींची पुन्हा तपासणी होणार आहे.

गेल्या महिनाभरात जिल्ह्यात सुमारे ४५ सौम्य भूकंपाचे धक्के नोंदवले गेले असून, त्यांची तीव्रता २.६ ते ४.३ रिश्टर स्केलदरम्यान होती. वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आधीच कमकुवत असलेल्या जुन्या इमारतींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

त्यामुळे फेरसर्व्हेक्षणात यापूर्वी धोकादायक घोषित केलेल्या आणि 'रेड मार्क' केलेल्या इमारतींना प्राधान्य दिले जाणार आहे. यात भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारतीच्या भिंती, छत, बीम, कॉलम तसेच पायाभूत संरचनेवर काही परिणाम झाला आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ अभियंते आणि संरचनात्मक तज्ज्ञांची मदत घेणार आहे.

प्रत्यक्ष कारवाई करा

शहरासह ग्रामीण भागात अनेक जुन्या आणि जीर्ण इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे केवळ सर्व्हेक्षण करून अहवाल तयार न करता धोकादायक इमारतींबाबत तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. गरजेनुसार इमारत रिकामी करणे, रहिवाशांचे स्थलांतर, दुरुस्ती किंवा इमारत पाडण्याचा निर्णय घेता येणार आहे.

'रेड मार्क' केल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित इमारतींबाबत पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. धोकादायक इमारतींची कागदावरील नोंद प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT