जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  file photo
नाशिक

Nashik Kumbh Mela | इंधनपुरवठ्याचा आराखडा सादर करा

Nashik Kumbh Mela | तेल कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पेट्रोल, डिझेल, सीएनजीसह गॅसपुरवठा नियोजनासाठी बैठक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने इंधन आणि एलपीजी गॅसचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. कुंभमेळ्यादरम्यान कोट्यवधी भाविक, विविध आखाड्यांचे साधू-संत आणि लाखो वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांना सविस्तर नियोजन आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध तेल व गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार नियोजन करण्याचे निर्देश दिले. कुंभमेळा काळात देशभरातून सुमारे आठ कोटी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वाहतूक व्यवस्था आणि अत्यावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. साधूग्राम, त्र्यंबकेश्वर आणि परिसरात उभारण्यात येणारे साधू-संतांचे तळ, धार्मिक मंडप तसेच २४ तास सुरू राहणारे अन्नछत्र आणि लंगर यासाठी मोठ्या प्रमाणावर घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सची आवश्यकता भासणार आहे.

त्यामुळे गॅसपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी कंपन्यांनी आवश्यक प्रतिबंधात्मक आणि प्रशासकीय उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी संबंधित इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांना आणि एमएनजीएलच्या प्रतिनिधींना प्रस्तावित नियोजनाचा सविस्तर आराखडा तयार करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सादर करण्यास सांगितले आहे.

या आराखड्याच्या आधारे जिल्हास्तरावर एकात्मिक नियोजन करण्यात येणार असून, कुंभमेळ्याच्या संपूर्ण कालावधीत इंधन व गॅसचा अखंडित पुरवठा राखण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. दरम्यान, या आदेशाची प्रत कुंभमेळा आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांनाही पाठवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT