नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात पेट्रोल व डिझेलच्या संभाव्य टंचाईच्या अफवा, साठेबाजी आणि काळाबाजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहे. जिल्हाभरात पेट्रोल व डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर थेट कायदेशीर बडगा उगारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष आदेश जारी केले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
त्यांना इंधन वितरण केंद्र, मोठ्या प्रमाणावर साठा करणाऱ्या संस्था तसेच संशयित ठिकाणांची अचानक तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या पेट्रोलियम पदार्थांच्या साठेबाजीबाबत आणि तुटवड्याबाबत समाजमाध्यमांवर विविध अफवा वेगाने पसरत आहेत.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांत भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि ग्राहकांची कोणतीही फसवणूक टाळली जावी, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व भागांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष विभागांची विभागणी केली आहे. यात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, चांदवड, नाशिक, कळवण, बागलाण, निफाड या प्रमुख भागांसाठी स्वतंत्र आणि विशेष पथके गठीत करण्यात आली आहेत.
या पथकांत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पुरवठा निरीक्षक आणि संबंधित विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक पथकाला त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित आणि अचानक तपासणी करून थेट जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही समिती केवळ तपासणी पुरती मर्यादित नसून, जिल्ह्यातील इंधनपुरवठा व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच म्हणून काम करणार आहे.
पंपांवर कोणत्याही क्षणी होणार तपासणी
पेट्रोलियम कंपन्यांकडून जिल्ह्यात इंधनाचा नियमित पुरवठा सुरू आहे. मात्र, तरीही काही समाजकंटक किंवा संस्था मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करून, त्याचा बेकायदेशीर साठा करून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या पथकांना इंधन पंपांवर कोणत्याही क्षणी अचानक तपासणी करणे, प्रत्यक्ष साठा आणि उपलब्ध नोंदवही यांची पडताळणी करणे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची काटेकोर चौकशी करणे, कोणत्याही केंद्रावर साठेबाजी किंवा नियमभंग आढळल्यास तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.