शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे.  छाया-हेमंत घोरपडे
नाशिक

Nashik Rain Update | तंत्रज्ञानाचा इशारा; यंत्रणेची यशस्वी सज्जता

Nashik Rain Update | रात्रभर जागे होते अधिकारी, कर्मचारी : आपत्ती परीक्षेत प्रशासन उत्तीर्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर व जिल्ह्यासाठी ढगफुटीसदृश अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अक्षरशः अलर्ट मोडवर होती. अवघ्या काही तासांत जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस, अग्निशमन दल, महसूल विभाग, आरोग्य यंत्रणा, वीजत वितरण कंपनी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्जता दाखविली. प्रत्यक्षात अपेक्षेइतका पाऊस झाला नाही. मात्र, यंत्रणा आपत्तकालीन परीक्षेत घवघवीत गुणांनी उत्तीर्ण झाली.

सर्वच विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढत, आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिल्यामुळे यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहरासह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्याचा पश्चिम भाग, सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी परिसरात ढगफुटीसदृश अतिवृष्टीची शक्यता असल्याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने, जिल्हा प्रशासन तत्काळ सतर्क झाले होते.

नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याबरोबरच त्याठिकाणी यंत्रणा सज्ज केली गेली. आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले. नदीकाठ, पूरप्रवण क्षेत्रे, धरणातील पाणीसाठी आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नजर ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे हे सर्व वरिष्ठ अधिकारी प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून होते.

तलाठ्यांपासून अपर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तसेच ग्रामसेवकांपासून उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) एक तुकडीही मागविण्यात आली होती. या संपूर्ण घडामोडींचे केंद्रबिंदू ठरला तो जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग. या विभागामार्फत विविध आदेश निर्गमित करण्यात येत होते. त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी आवश्यक कार्यवाही करीत होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्या संपर्कात होते. एकूणच संकट आले नाही, ही जमेची बाब असली, तरी संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज होती, हा त्याहून मोठा दिलासा नाशिककरांना यानिमित्त मिळाला. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पूर्वसूचना आणि प्रशासनाची तत्परता यांचा योग्य संगम झाल्यास संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा परिणाम कमी करता येऊ शकतो याची प्रचितीही नाशिकसह संपूर्ण अनुभवता आल्याने, नाशिकवरील ढगफुटीच्या शक्यतेची राज्यभर एकच चर्चा होत आहे

पशुसंवर्धन, वन विभागही सज्ज

मंगळवारी (दि. ७) सकाळी ७ वाजता इगतपुरी तालुक्यात पूरसदृश परिस्थितीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी प्रसाद आणि सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता घटनास्थळी रवाना झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागालाही संभाव्य दरड कोसळण्याच्या घटनांबाबत सतर्क राहून रस्ते तातडीने वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आरोग्य, पशुसंवर्धन, वन, पोलिस, ग्रामपंचायत आदी विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. मालेगावचे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण हे सटाणा व सुरगाणा, तर अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील या दिंडोरी आणि नाशिक शहरांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

नियंत्रण कक्षात २४ तास

अधिकारी जिल्हा आपत्ती निवारण कक्षात २४०७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी येथे कार्यरत होते. नियंत्रण कक्षात २४ तास तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्यातील पावसाच्या प्रत्येक घडामोडीची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद हे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह वरिष्ठ प्रशासनाला वेळोवेळी देत होते. तसेच वाऱ्याचा वेग, ढगांची दिशा आणि हवामानातील बदल याचीही माहिती घेतली जात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT