नाशिक : प्रसूतीनंतर परिचारिकांनी ‘तुम्हाला मुलगा झाला,’ असे पालकांना सांगितल्याने तसेच शासकीय कागदोपत्री सर्वत्र फीमेलच्या ‘एफ’ ऐवजी मेलच्या ‘एम’ अशी नोंद झाल्याने जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला होता. चौकशी समितीच्या अहवालानुसार तोंडी दाव्यांमुळे हा गोंधळ झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पाच जणांना बडतर्फ केले असून, आठ जणांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. तसेच पालकांनीही मुलगी आमचीच असल्याचे मान्य केले आहे. (There was confusion in the district hospital as "M" for "Male" was written instead of "F" for "Female" everywhere in the government documents)
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. शिंदे यांनी माहिती दिली. यावेळी मुलीचे वडील महेश पवार, आजोबा ज्ञानेश्वर, आजी संगीता पवार, काका कृष्णा पवार आदी उपस्थित होते. डॉ. शिंदे यांनी सांगितले की, रुग्णालयात प्रसूतीनंतर कागदोपत्री मुलीऐवजी मुलगी अशी नोंद झाली. त्यानंतर डिस्चार्ज घेताना मुलगी सोपवल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. चौकशीत चुकीची झालेली नोंद तसेच जन्माला मुलगीच आली होती, असे निष्पन्न झाले. गर्भवतीने केलेल्या सोनोग्राफी चाचणीत आणि जन्मलेल्या मुलीला जो आजार आढळून आला तो एकच असल्याने मुलगी त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पालकांनी मुलगी त्यांचीच असल्याचे मान्य केले. दरम्यान, चिमुकलीवर खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. तिची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा रुग्णालयात महिन्याला सुमारे ८५० प्रसुती होतात तसेच सुमारे ३५० सिझेरीअरन शस्त्रक्रिया होतात. त्यात अशा घटनांमुळे जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलिन होऊन नागरिकांचा रुग्णालयावरील विश्वासास तडा बसू शकतो. तरी कुठल्याही आरोग्यविषयक अडचणी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक