AI Based Signal System File Photo
नाशिक

Nashik Traffic Police | सिग्नल न पाळणाऱ्या विरोधात आता थेट ऑनलाइन कारवाई

Nashik Traffic Police | सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट वाहन मालकाला जाणार ई-चलन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी २० फेब्रुवारीपासून महत्त्वाचा निर्णय अंमलात आणण्यात आला असून, शहरातील ४० प्रमुख चौकांवरील सिग्नलवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

सिग्नल न पाळणाऱ्या वाहनचालकांवर आता थेट ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सिग्नल तोडणारी वाहने स्पष्टपणे कैद केली जातील. वाहनाच्या नंबरप्लेटच्या आधारे संबंधित वाहन मालकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर थेट ई-चलन पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई टाळून नियम मोडण्याची सवय असलेल्या वाहनचालकांवर आता स्वयंचलित कारवाई होणार आहे.

या उपाययोजनेमुळे नाशिकमधील बेशिस्त वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या वाहनांवर दंड आकारला जाईल, त्या वाहन मालकांसाठी वाहतूक शाखा तसेच पोलिस आयुक्तालयातील विशेष काउंटरवर दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र, ठरावीक कालावधीत दंड न भरल्यास संबंधित वाहनास आरटीओ कामकाजात अडथळे येणार असून, वाहनाची खरेदी-विक्री, हस्तांतरण किंवा इतर प्रक्रियेदरम्यान एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असून, त्यामुळे वाहतूक पोलिस यंत्रणेवरील ताणही लक्षणीयरीत्या वाढला आहे.

अनेक अपघातांमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणे हे प्रमुख कारण ठरत असून, त्यात मृत्यूंचे प्रमाणही चिंताजनक आहे. मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही वाहतुकीसाठी ऑनलाइन शिस्त लागू करण्यात आली असून, यासाठी वाहतूक शाखा पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे

नियम प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ऑनलाइन कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे व कारवाई टाळावी.
- अद्विता शिंदे सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT