नाशिक

Nashik City Link | अपघातांमध्ये वाढ; प्रत्येक रविवारी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सिटीलिंकच्या बस अपघातांमध्ये वाढ झाल्याने चिंतेत असलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाने आता बसचालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तपोवन व नाशिक रोड या दोन्ही आगाराच्या बसचालकांना प्रत्येक रविवारी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार असून नियमांचे पालन करण्यासंदर्भात सूचना दिल्या जाणार आहेत.

सिटीलिंक बस अपघातांमुळे सिटीलिंकची जनमाणसातील प्रतिमा डागाळली जात आहे. बेदरकारपणे बस चालवणे, नियमांचे पालन न करणे, अपघात घडविणे आदी तक्रारी बस चालकांविरूध्द प्राप्त होत असल्याने सिटीलिंक व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. सध्या तपोवन आगारात २८७ व नाशिक रोड आगारात १८६ असे एकूण ४७३ चालकांमार्फत शहर बस वाहतुकीचे संचलन करण्यात येते. बसेस चालविताना चालकांकडून मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी बसचालकांना प्रशिक्षण देण्याची योजना सिटीलिंक व्यवस्थापनाने आखली आहे. सद्यस्थितीत सिटीलिंक कार्यालयात पोलिस अधिकारी तसेच तज्ज्ञांकडून बसचालकांना मार्गदर्शन व समुपदेशन केले जात आहे. दर रविवारी तपोवन व नाशिक रोड अशा दोन्ही आगाराच्या प्रत्येकी २५ चालकांना बसेस सुरक्षित चालविण्याविषयी तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी प्रबोधन केले जाते. त्याचप्रमाणे 'नाशिक फर्स्ट' या संस्थेत पाठवून मार्गदर्शन करण्यात येते. त्याचप्रमाणे काही व्याख्याने आयोजित करून बस चालकांचे मनोबल वाढविण्यात येते. परंतु, तरीही छोट्या-मोठ्या अपघातात वाढ होत असल्याचे महानगर परिवहन महामंडळाने म्हटले आहे. यावर उपाय म्हणून शहरात प्रत्यक्ष बस चालवून चालकांना प्रशिक्षण दिल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त करत दर रविवारी ५० चालकांना प्रत्यक्ष बस चालवून अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बस अपघाताची कारणे…

  • सिग्नल तोडणे, बेदरकारपणे वाहन चालविणे.
  • दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे.
  • बस चालविताना मोबाईलवर बोलणे, धोकेदायकपणे ओव्हरटेक करणे.
  • मद्यसेवन करून बसेस चालविणे, बस चालवताना प्रवाशांशी वाद घालणे.
  • सुरक्षेचे नियम न पाळणे, बस चालविताना दोन्ही दरवाजे बंद न करणे.

३२ गंभीर अपघात, सहा नागरिकांचा मृत्यू

सिटीलिंकमुळे आतापर्यंत शहर परिसरात ३२ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले असून यात सहा नागरिकांचा बळी गेला आहे. यात ८ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ या काळात गंभीर स्वरूपाचे पाच अपघात घडले. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या काळात गंभीर स्वरूपाचे १७, तर किरकोळ स्वरूपाचा एक अपघात घडला. या काळात चार नागरिकांचा मृत्यु झाला. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात किरकोळ स्वरूपाचे चार, तर गंभीर स्वरूपाचे तब्बल २० अपघात झाले आणि त्यात दोन नागरिकांचा बळी गेला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT