नाशिक: नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या 'सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक' या शहर बससेवेला चार वर्षे पूर्ण झाली असून, पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या चार वर्षात सिटीलिंकच्या बसेस तब्बल ५.७८ कोटी किलोमीटर धावल्या असून या बससेवेचा ८.०९ कोटी प्रवाशांनी लाभ घेतला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून ८ जुलै २०२१ पासून सिटीलिंकच्या शहर बससेवेला टप्प्याटप्प्याने सुरूवात करण्यात आली. या बससेवेसाठी सीएनजीच्या २०० तर डिझेलच्या ५० बसेस आॉपरेटर्सच्या माध्यमातून चालविण्यात येत आहेत. सध्यास्थितीत तपोवन डेपो येथून एकूण २९ मार्गांवर १५० बसेसच्या माध्यमातून तर नाशिकरोड डेपो येथून २८ मार्गांवर १०० बसेसच्या माध्यमातून सेवा पुरविली जाते. दोन्ही डेपो मिळून पहिल्या एकूण ५७ मार्गांवर २५० बसेसच्या माध्यमातून सेवा पुरविली जाते.
पहिल्यावर्षी १०४ बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या. याबसेस सरासरी २१ हजार ६२३ किलोमीटर दररोज याप्रमाणे ७५ लाख ७३ हजार ५०७ किलोमीटर धावल्या. या माध्यमातून पहिल्यावर्षी ८५ लाख ५६ हजार ७५१ प्रवाशांना सेवा दिली गेली. दुसऱ्या वर्षी २०९ बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. या बसेस ४४ हजार ९७२ किलोमीटर दररोज याप्रमाणे १ कोटी ६४ लाख १४ हजार ८४८ किलोमीटर धावल्या. या माध्यमातून २ कोटी ३७ लोख १० हजार ५६२ प्रवाशांना सेवा दिली गेली. तिसऱ्या वर्षापासून सर्वच २५० बसेस रस्त्यावर उतरविल्या गेल्या. या माध्यमातून ४५ हजार ५८९ किलोमीटर दररोज याप्रमाणे १ कोटी ६६ लाख ३९ हजार ९६५ किलोमीटर बसेस धावल्या. या माध्यमातून २ कोटी ४६ लाख ९८ हजार २८८ प्रवाशांनी लाभ घेतला. चौथ्या वर्षी ४६ हजार ९३० किलोमीटर दररोज या प्रमाणे १ कोटी ७२ लाख ७० हजार १६ किलोमीटर बसेस धावल्या असून या माध्यमातून २ कोटी ४० लाख ३३ हजार ९१२ प्रवाशांनी सिटीलिंकच्या बससेवेचा लाभ घेतला आहे.
सिटीलिंकने गेल्या चार वर्षात प्रवाशांकडून तिकीटांच्या माध्यमातून तब्बल २४३ कोटी, ५७ लाख ९७ हजार ५३९ रुपयांचा महसुल मिळविला आहे. पहिल्यावर्षी २२ कोटी ६० लाख ६३,६३४ रुपये, दुसऱ्या वर्षी ७२ कोटी १६ लाख ६२ हजार ६४९ रुपये, तिसऱ्यावर्षी ७४ कोटी ५१ लाख ९१ हजार १५ रुपये तर चौथ्या वर्षी ७४ कोटक्ष २८ लाख ८० हजार २४१ रुपयांचा महसुल सिटीलिंकला प्राप्त झाला आहे.