विठूनामाच्या गजरात आणि संतश्रेष्ठ निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान, मुक्ताईच्या जयघोषात शहरात दाखल झाली.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

नाशिकनगरी झाली विठुमय ! विठ्ठल नामाने दुमदुमली धर्मनगरी ।।

Sant Nivruttinath Palkhi Trimbak : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे भक्तिभावात स्वागत

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर (नाशिक) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी गुरुवारी (दि. १२) विठूनामाच्या गजरात आणि संतश्रेष्ठ निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान, मुक्ताईच्या जयघोषात शहरात दाखल झाली. भगवे झेंडेधारी वारकऱ्यांच्या अनुशासित रांगा अन् टाळ-मृदंगाच्या निनादात अभंगगायनाने संपूर्ण परिसर भक्तीने भारला होता. पालखीसोबतच्या दिंड्यांचे नाशिक पंचायत समिती आवारात प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. सायंकाळी गणेशवाडी परिसरातील भाजीमंडई येथे परंपरेनुसार दिंडी विसावली. त्याठिकाणी महापालिकेने व्यवस्था ठेवली आहे.

संत निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी मंगळवारी (दि.10) त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा गहिनीनाथ समाधी येथे पडला, तेथून दुसरा मुक्काम बुधवारी सायंकाळी सातपूर येथे झाला. गुरूवारी सकाळी दिंडीने वाट धरली. ९ वाजेच्या सुमारास पालखीचे नाशिक पंचायत समिती आवारात आगमन झाले. येथे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय आस्थापनांच्या विभागप्रमुखांच्या हस्ते संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थेचे अॅड. सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळाप्रमुख नवनाथ गांगुर्डे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज सामाजिक सेवा संस्थेचे पद्माकर पाटील , उपाध्यक्ष त्र्यंबकराज गायकवाड, नरहरी उगलमुगले, महंत भक्तीचरणदास महाराज आदी उपस्थित होते.

समन्वय साधणार : विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम

प्रशासनाच्या विविध आस्थापनांच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या हस्ते समस्त वारकऱ्यांचे स्वागत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, यंदा शासनाने पालखी सोहळ्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा परिषदेला अधिकार देऊन पाणी, स्वच्छता व आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या आहेत. नाशिक हद्दीबाहेर गेल्यानंतर वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हा भाग नाशिकच्या अधिकार क्षेत्राबाहेर असला तरी संबंधित राज्यस्तरीय विभागांशी समन्वय साधून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nashik Latest News

24 तास वैद्यकीय सेवा

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. आरोग्य विभागाचे पथक २४ तास कार्यरत आहे. नाशिक पंचायत समितीच्या आवारात अनेक वारकऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेत औषधोपचार घेतला.

नाशिकरोडला स्वागत, पळसेत मुक्काम

पंचायत समितीनंतर जलतरण तलाव येथे स्वागत होऊन पालखी जुने नाशिकमधील काजीपुरा येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. येथे दुपारी श्री विधिवत पूजन, आरती होऊन महाप्रसाद वाटप झाले. गणेशवाडी परिसरातील नवीन भाजी मार्केटमध्ये पालखी दुपारी तीनच्या सुमारास पोहोचली. सायंकाळी कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. आज, शुक्रवारी (दि. १३) सकाळी अकरा वाजता पालखी नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसरात पोहोचेल. त्यानंतर पळसे येथे मुक्काम करून सिन्नरमार्गे पुढील दिशेने प्रस्थान करेल.

  • देखणी बैलजोडी अन् उमद्या अश्वांनीही वेधले लक्ष

  • चांदीच्या रथात तुळशी-बुक्क्याच्या तबकातील ‘श्रीं’च्या चरणपादुकांचे भाविकांकडून दर्शन

  • पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांनी धरला भजनांवर ठेका

  • दिंड्यांमधील टाळकरी, वीणेकरी, भालदार चोपदारांचाही ताल

  • पारंपरिक वेशभूषेतील भगिनींनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंद

  • वारकऱ्यांसोबत सेल्फीसाठी भाविकांची गर्दी

अशी होणार पालखी मार्गस्थ

नाशिक - पंचवटी - मुक्तिधाम (नाशिक रोड) - पळसे - लोणारवाडी - खंबाळे - पारेगाव - गोगलगाव - राजुरी - बेलापूर - राहुरी - डोंगरगण - अहमदनगर - साकत - घोगरगाव - मिरज गाव - चिंचोली - कर्जत - कोरेगाव - रावगाव - जेऊर - कंदर - दगडी अकोले - करकंब - पांढरीवाडी - चिंचोली - पंढरपूर.

फुगड्यांचा लुटला आनंद

पंचायत समिती आवारात नाथांच्या पालखीसमोर वारीत सहभागी माता-भगिनी व महिला पोलिसांनी फुगड्या खेळून आनंद लुटला. लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ-चिपळ्यांसह जय जय विठ्ठलचा घोष केला. संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT