Nashik FDA Food  (file photo)
नाशिक

Nashik FDA Food | "नागरिकांनो, अन्नात भेसळ आढळल्यास 'या' क्रमांकावर करा तक्रार! एफडीए सहआयुक्त मंगेश माने यांचे आवाहन"

Nashik FDA Food | अवघ्या 12 दिवसांत 'एफडीए'कडे 124 ऑनलाइन तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अन्नातील भेसळ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि अस्वच्छतेविरोधात नागरिक अधिक जागरूक होत असल्याचे चित्र नाशिक विभागात दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या ऑनलाइन तक्रार पोर्टलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, १५ जुलैपासून अवघ्या १२ दिवसांत तब्बल १२४ ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये निकृष्ट दर्जाचे पॅकेज्ड अन्न, लेबलिंगमधील त्रुटी, अस्वच्छ हॉटेल्स आणि भेसळीच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेमुळे नागरिक थेट तक्रार नोंदवू लागले आहेत. पूर्वी दूरध्वनी किंवा लेखी अर्जाद्वारे केलेल्या तक्रारींच्या कारवाईचा मागोवा घेणे अवघड जात होते. मात्र, आता complaints.mahafda.in या ऑनलाइन पोर्टलमुळे तक्रारीची सद्यस्थिती, तपासाची प्रगती आणि प्रशासनाने केलेली कारवाई नागरिकांना ऑनलाइन पाहता येत असल्याने कारभारात अधिक पारदर्शकता आली आहे.

तक्रारींचा तपशील (एकूण १२४ तक्रारी)

एफडीएकडे प्राप्त झालेल्या १२४ तक्रारींची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:

  • निकृष्ट दर्जाचे पॅकेज्ड अन्न व लेबलिंगमधील त्रुटी: २८ तक्रारी (सर्वाधिक)

  • अस्वच्छ उत्पादन व साठवणूक: १६ तक्रारी

  • मुदतबाह्य अन्नविक्री: १३ तक्रारी

  • दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ: १३ तक्रारी

  • अन्नामध्ये बाह्य घटक आढळणे: १२ तक्रारी

  • प्रतिबंधित पदार्थांबाबत: १२ तक्रारी

  • हॉटेल्समध्ये निकृष्ट अन्न देणे: १० तक्रारी

  • खाद्यतेल व तुपातील भेसळ: ३ तक्रारी

  • दिशाभूल करणारे लेबल: २ तक्रारी

  • इतर तक्रारी: १५ तक्रारी

तक्रार कशी करावी?

'एफडीए'ने नागरिकांना दर्जा, स्वच्छता किंवा भेसळीबाबत कोणतीही शंका असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे:

  • ऑनलाइन पोर्टल: complaints.mahafda.in

  • टोल-फ्री क्रमांक: १८००२२२३६५

प्रत्येक तक्रारीची संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाला कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा 'एफडीए'ने दिला आहे. नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी नागरिकांनी सुरक्षित अन्न अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT