सिडको (नाशिक) : शासनाने व सिडकोने फ्री होल्डची घोषणा केली असली तरी ते कायमचे फ्री होल्ड होणार किंवा ९० वर्षांसाठीच फ्री होल्ड होणार याबाबत खुलासा केलेला नाही. पहिल्या योजनेचा करार १९७२ व १९७५ ला झालेला आहे. या कराराला ५५ वर्षे झाले असून, तो संपण्यास ३५ वर्षे शिल्लक राहिले आहे. पुन्हा ९० वर्षांनंतर सिडको नागरिकांच्या घरांवर हक्क करणार आहेत का? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
सिडकोने १९७२ पासून मिळकती लीज डीडने दिलेल्या आहेत. बरेचशा मिळकतीचा ९० वर्षांचा भाडेपट्टा पूर्णत्वाकडे जात आहे. काहींचा लीज करार हा ३० वर्षांनंतर संपणार आहे. काही मिळकतींचा करार हा साठ वर्षांनी संपणार आहे. त्याप्रमाणे सिडकोनेसुद्धा लीज करून देताना आता नवीन करार साठ वर्षांचे केलेले आहेत. २०३० नंतर सिडको फक्त तीस वर्षांचे लीज करून देणार आहे, यावरून नागरिकांच्या मनात संभ्रम तयार झालेला आहे. सिडको किती वर्षांसाठी फ्री होल्ड करणार? त्याबद्दल सिडकोने स्पष्ट खुलासा केलेला दिसत नाही.
फ्री होल्ड ९० वर्षांपर्यंतच असेल तर त्यापुढे नवीन काय धोरण सिडको महामंडळ ठरवणार का? त्यामुळे फ्री होल्ड जनतेचे की फायद्याचे ठरणार की नुकसानीचे, अशी चिंता नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्याबाबतही निश्चित भूमिका स्पष्ट झालेली नाही. फ्री होल्ड किती काळासाठी आहे. त्याबाबत सिडकोने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी गणेश पवार, धनंजय बुचडे, दशरथ गांगुर्डे, महेश धनाइत, भगवंत अहिरे आदींनी केली आहे.
पश्चिम मतदारसंघाच्या आ. सीमा हिरे यांनी शासनस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने सिडको फ्री होल्डचा निर्णय झाला आहे. नागरिकांच्या अपेक्षांप्रमाणेच आमदार सीमा हिरे शासनाकडे पाठपुरावा करतील व सिडको प्रशासनानेसुद्धा खुलासा केला पाहिजे.राहुल गणोरे, अध्यक्ष, सिडको भाजप