सिडको : पुढारी वृत्तसेवा
मुसळधार पावसामुळे सिडको परिसरात जनजीवन विस्कळीत झाले. प्रभाग २५, २७ व जुने सिडको परिसरात बडदेनगर या तीन ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर कोसळली, तर दत्तनगर भागात रस्त्यावरील पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रभाग २७ मधील दत्तनगर येथे रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नितीन दातीर यांनी घटनास्थळी धाव घेत मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून तातडीने पाण्याचा निचरा करून घेतला.
प्रभाग २५ मध्ये साईखेडकर हॉस्पिटलच्या पाठीमागे बाभळीचे, तसेच दत्तमंदिर परिसरात गुलमोहराचे झाड रस्त्यावर कोसळले. नगरसेविका साधना पवन मटाले यांनी उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांच्याशी संपर्क साधत त्वरित मदतकार्य सुरू केले.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही ठिकाणांवरील झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली. जुने सिडकोतील बडदेनगर येथेही झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून झाड हटवून रस्ता मोकळा केला.
याशिवाय सिडको भागातील पाच ते सात ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे व उपअभियंता हेमंत पढे यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाण्याचा निचरा करून घेतला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.