सिडको (नाशिक) : नाशिक महापालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार (दि. ३०) हा शेवटचा दिवस असल्याने सिडको विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते व समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. विविध पक्षांकडून एबी फॉर्म उशिरा मिळाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष पसरला. विशेषतः प्रभाग २६ मध्ये एबी फॉर्म वरून आमदार सीमा हिरे व कैलास आहिरे यांच्यात शाब्दीक चकमक झाली .
शेवटच्या दिवशी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी सकाळपासूनच विभागीय कार्यालयात गर्दी वाढत होती. “एबी फॉर्मशिवाय उमेदवारी कशी दाखल करायची?” असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित केला जात होता.
प्रभाग २६ (क)मध्ये दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याचा दावा समोर आल्याने वातावरण अधिकच तापले. ऐन वेळेस दुपारी साडेचारच्या सुमारास आमदार सीमा हिरे या पुष्पावती पवार यांची प्रभाग क्रमांक २६-कमधून उमेदवारी ग्राह्य धरण्यात यावी, असे शहराध्यक्षांचे पत्र घेऊन विभागीय कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे यांनी आमदार सीमा हिरे यांना दालनात जाण्यास मज्जाव केला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दुपारी तीन वाजेनंतर कोणालाही आत प्रवेश देऊ नये, मग आमदारांना का प्रवेश दिला जात आहे? , असा सवाल करत दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली.
या वादादरम्यान कैलास अहिरे यांनी थेट आमदार सीमा हिरे यांच्यावर आरोप करत आम्ही गेली ४० वर्षे भाजपात प्रामाणिकपणे काम केले आहे. आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय केला जात आहे,” असे ठणकावून सांगितले. स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे यांनी हस्तक्षेप करत कोणालाही आत सोडले जाणार नाही. ज्यांनी आधी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे, त्याच उमेदवाराचा एबी फॉर्म वैध धरला जाईल, असे स्पष्ट निर्देश दिल्याने तणाव निवडला.
भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांची पोलिसांकडून चौकशी
भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांचे पती राकेश ढोमसे यांना अंबड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पोलिसांनी त्यांची सुमारे तासभर कसून चौकशी केली. याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी करण्यात आली असून, चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले आहे. यावेळी पोलीस ठाण्यात आमदार सीमा हिरे उपस्थित होते.