Chemist Strike 
नाशिक

Nashik Chemist Strike | नाशिक जिल्ह्यातील 9 हजार केमिस्ट आज संपावर! ऑनलाईन औषधविक्रीविरोधात बाजारपेठ ठप्प

Nashik Chemist Strike | आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन धावणार रुग्णांच्या मदतीला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऑनलाइन औषधविक्री, कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.२०) पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे जिल्ह्यातील आठ हजारांहून अधिक किरकोळ औषधविक्रेते व बाराशेपेक्षा अधिक होलसेल औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आपत्कालीन स्थितीत अन्न व औषध प्रशासन रुग्णांच्या मदतीला धावणार असून, त्यासाठी प्रशासनाने थेट अधिकाऱ्यांचेच संपर्क क्रमांक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री तत्काळ बंद करावी, जीएसआर ८१७ (ई) आणि जीएसआर २२० (ई) अधिसूचना रद्द कराव्यात, डीपीसीओ २०१३ अंतर्गत नियंत्रित नफा मर्यादा हटवावी, औषधविक्रेत्यांना बॅण्ड सबस्टिट्यूट औषध देण्याचा अधिकार द्यावा आदी मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्वच औषधविक्रेते सहभागी होणार असल्याने, औषध विक्री बंद राहणार आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवत शांतता व संयम राखावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त अ. तु. बर्डे यांनी केले आहे. तथापि, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहू शकतात, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती दक्षता घेण्याचेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

औषध दुकानदारांना परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध होणे हा त्या मागील मुख्य उद्देश असून, बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे व आदेशांची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होवू नये.
-अ. तु. बडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT