शेतकरी माणिक वाळूबा साळुंखे यांनी ‘हरण्या–पोपट्या’ या खिल्लार जातीच्या बैलजोडीचा पाचवा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला Pudhari
नाशिक

Nashik Bullock Pair Birthday | वडनेर भैरव येथील ‘हरण्या–पोपट्या’ बैलजोडीच्या अनोख्या वाढदिवसाची परिसरात चर्चा

परंपरा, संस्कृती आणि पशुप्रेम जपणाऱ्या साळुंखे परिवाराची परिसरात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Harnya Popatya Bullock Birthday

चांदवड : यांत्रिक शेतीच्या आधुनिक काळातही बैलांविषयीचे प्रेम, जिव्हाळा आणि परंपरा जपणारे उदाहरण वडनेर भैरव येथे पाहायला मिळाले. येथील शेतकरी माणिक वाळूबा साळुंखे यांच्या ‘हरण्या–पोपट्या’ या खिल्लार जातीच्या बैलजोडीचा पाचवा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अनोख्या वाढदिवसाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

शेतकऱ्याचा जिवलग सखा म्हणून बैलाला ग्रामीण संस्कृतीत विशेष स्थान आहे. ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांच्या वाढत्या वापरामुळे शेतीतील बैलांचे महत्त्व काहीसे कमी झाले असले, तरी साळुंखे परिवाराने परंपरा आणि आवड म्हणून ही बैलजोडी आजही जपली आहे. कुटुंबातील मुला-नातवांच्या वाढदिवसाप्रमाणेच या बैलजोडीचाही वाढदिवस दरवर्षी थाटामाटात साजरा केला जातो.

साळुंखे परिवाराच्या प्रत्येक पिढीत खिल्लार आणि आकर्षक बैलजोडी दावणीला असण्याची परंपरा राहिली आहे. पाच वर्षांपूर्वी माणिकराव साळुंखे यांनी छंद आणि पशुप्रेमातून ‘हरण्या’ व ‘पोपट्या’ या बैलांना गव्हाणीला आणले. त्यांच्या संगोपनात आजही कुटुंबातील सर्व सदस्य प्रेमाने सहभागी होतात.

वडनेर भैरव परिसर द्राक्ष व टोमॅटो शेतीसाठी प्रसिद्ध असून बहुतांश शेती आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केली जाते. तरीदेखील साळुंखे परिवाराने केवळ हौस आणि संस्कृती जपण्यासाठी खिल्लार बैलजोडी सांभाळली आहे. भूतदयेची भावना प्रत्यक्ष कृतीतून जपणाऱ्या या परिवाराचे कौतुक परिसरात होत आहे.

माणिकराव साळुंखे यांनी सांगितले की, “वंशपरंपरेने शेती करत असताना बैलजोडी ही आमच्या घराची शान राहिली आहे. आधुनिक काळातही ही परंपरा आणि हौस जपण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.”

‘हरण्या–पोपट्या’ ही बैलजोडी वडनेर भैरव, पाचोरे वणी, वडाळीभोई, खेडगाव आदी परिसरातील गावांमध्ये विविध यात्रांतील रथांना मानाची जोडी म्हणून जुंपली जाते. तसेच वडनेर भैरव येथील कालभैरवनाथ महाराज यात्रेत आणि पोळा सणातही ही जोडी विशेष आकर्षण ठरते.

कुठलाही छंद पैशांत मोजता येत नाही. त्यातून मिळणारे समाधान आणि आनंद हेच खरे संपत्ती असते, याचा प्रत्यय साळुंखे परिवाराच्या या उपक्रमातून येत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT