चांदवड (नाशिक) : हिरवाईने नटलेला निसर्ग, वाहणारे धुके, पडणारा पाऊस अन् डोंगराच्या दरी खोऱ्यातून वाहणारे धबधबे असा निसर्गाच्या नयनरम्य वातावरणाने चांदवड शहर पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे या निसर्ग साैंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी वाढू लागली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे चांदवड शहरातील सह्याद्री पर्वतरांगेतील निसर्ग फुलला आहे. पर्यायाने सह्याद्री पर्वतरांगेने अंगावर हिरवी चादर पांघरल्याचा भास होत आहे. या हिरवाईत सतत बरसणारा पाऊस, पर्वतरांगेला स्पर्श करून हवेत उडणारे धुके, डोंगराच्या कान्याकोपऱ्यातून वाहणारे धबधबा पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करीत आहे. हा निसर्ग 'याची डोळा, याची देही' पाहण्यासाठी शाळा, महाविद्यालये, पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत. याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे 'चांदवड' हे धार्मिक स्थळाबरोबरच एक उत्तम 'पर्यटक'स्थळ म्हणून नावा रुपाला येत आहे.
सध्या, श्रावणाचा महिना सुरू असल्याने येथील श्री चंद्रेश्वर गडावरील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहे. हे भाविक दर्शनानंतर येथील निसर्गाच्या प्रेमात पडले आहेत. श्री चंद्रेश्वर गडावरून खाली कोसळणारा मोठा झरा येथील मुख्य आकर्षण आहे. विशेष म्हणजे येथून समोर दिसणारा साडेतीन रोडगे व शिव टेकडी, खोकड तलाव अतिशय सुंदर दिसतात.