

जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्या हवामान बदलांच्या झळांनी मनुष्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः भारतासारख्या देशात मान्सूनच्या चक्रावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला दिसत आहे. अलीकडेच चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायक्लोन मॅन’ डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी हवामानातील बदल टिपण्यास आधुनिक प्रणालीही अपुरी ठरत असल्याचे म्हटले आहे. यावरून त्याचे गांभीर्य लक्षात यावे.
भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीची सध्या समाजमाध्यमांत चर्चा आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी पारंपरिक संगणकीय मॉडेल्स आणि आकडेवारीवर आधारित गणितीय प्रणाली आता हवामानातील क्षणाक्षणाला होणारे बदल पकडू शकत नाही, अशी स्पष्टपणाने कबुली देताना स्थानिक पातळीवर अचानक येणार्या तीव्र हवामानाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पारंपरिक हवामान पद्धतींची अचूकता कमी होत असून पूर्वीप्रमाणे सहजतेने वेळेपूर्वी अंदाज वर्तवणे आव्हानात्मक ठरत असल्याचे मान्य केले आहे. याच मुलाखतीमध्ये त्यांनी स्थानिक पातळीवर अचानक होणारी ढगफुटी, काही तासांत होणारी अतिवृष्टी, गारपीट, उष्णतेच्या लाटा यांसारख्या घटनांमध्ये होणार्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली, तसेच या आव्हानांना तोंड देण्यासाठी हवामान विभाग आपल्या क्षमता वाढवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजांकडे गांभीर्याने पाहणार्या सर्वसामान्यांच्या द़ृष्टीने त्यांनी विषद केलेली माहिती ही उद्बोधक आहे. कारण, बरेचदा सामान्य नागरिक ढगफुटी, अतिवृष्टीसारख्या घटनांनंतर हवामान विभागावर दोषारोप करून टीकेचा भडीमार करत असतात; परंतु वस्तुस्थिती ही आहे की, हे बदल पराकोटीला पोहोचल्याने त्यांचा अदमास घेण्यास तंत्रज्ञानही थिटे पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये नुकतीच ढगफुटी होऊन जनतेचे अपरिमित नुकसान झाले. जिथे तंत्रज्ञानावरच निसर्गाने कुरघोडी केल्याने दोष तरी कुणाला द्यायचा, हाही प्रश्न पडतोच.
पूर्वीचा कालखंड आठवून पाहा. पावसाळ्यात एखाद-दुसरी ढगफुटीची घटना, तीही ईशान्येकडील राज्यांत, हिमालयीन प्रदेशात झाल्याचे ऐकायला मिळायचे. ढगफुटी म्हणजे अल्पावधीत एका निश्चित भागात 100 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद. 2023-24 मध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रातील कोकण भाग, तसेच सिक्कीम व जम्मू-काश्मीरमध्ये 150 पेक्षा अधिक ढगफुटीच्या घटना नोंदविल्या गेल्या. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, 2000 पूर्वी अशा घटना वर्षाला 10-12 असत; परंतु सध्या त्यांची संख्या 50 च्या वर गेली आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश ढगफुटींविषयी हवामान खात्याला आकलन झालेले नव्हते.
समुद्राच्या तापमानात 0.5 अंश सेल्सिअस इतकी वाढदेखील वादळी ढग तयार करण्यास पुरेशी ठरते. यामुळे अंदाज दिला गेला, तरी त्याच्या अंमलबजावणीत त्रुटी राहतात. वातावरणात वाढलेली आर्द्रता ढग तयार होण्यासाठी पोषक ठरते; मात्र ती नियंत्रित नसल्यास ढगफुटीला कारणीभूत होते. जागतिक तापमानवाढीत भारताचा सहभाग सुमारे 7 टक्के असून, शहरांमध्ये हिट आयलंड इफेक्टमुळे लोकल हवामानात तीव्र फरक पडतो.
सामान्यतः जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सुमारे 75 टक्के पावसाचे प्रमाण नोंदवले जाते. 2023 मध्ये मान्सूनची सुरुवात उशिरा झाली. नंतर काही आठवडे तीव्र पाऊस, मग पुन्हा कोरडा काळ, नंतर अचानक ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी असे मान्सूनचे चक्र राहिल्यामुळे शेती, जलसंपत्ती व उपजीविकेवर परिणाम झाला. यंदाच्या वर्षी तर ऐन वैशाखात मान्सूनचे आगमन होऊन अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. सुरुवातीचे काही दिवस हवामान खात्याला हा पूर्वमान्सूनचा पाऊस आहे की अवकाळी आहे, याचे आकलन झाले नव्हते. भारतात 2024 मध्ये नोंदवलेल्या एकूण 164 हवामान संबंधित आपत्तींपैकी केवळ 43 टक्के घटनांचा योग्य अंदाज वेळेवर दिला गेला. 2022-24 दरम्यान सुमारे 35 लाख हेक्टर जमीन सतत बदलत्या हवामानामुळे नुकसानग्रस्त झाली.
चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायक्लोन मॅन’ डॉ. मृत्युंजय महापात्र यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा आपत्ती धोका कमी करणारा पुरस्कार 2025 मिळाला आहे. अमेरिकन हवामान संस्थेकडूनही त्यांना ‘आऊटस्टँडिंग सर्व्हिस अॅवॉर्ड 2025’ देण्यात आला आहे. तोट्याचा धोका कमी करणार्या हवामान अंदाज यंत्रणेच्या सुधारणांसाठी त्यांनी आयएमडीमध्ये 30 वर्षांपेक्षा अधिक सेवा दिली आहे. ते जागतिक हवामान संघटनेचे तिसरे उपाध्यक्ष आहेत. अशी व्यक्ती जेव्हा हवामानातील बदल टिपण्यास आधुनिक प्रणालीही अपुरी ठरत आहे, असे म्हणते तेव्हा गांभीर्याची पातळी किती मोठी आहे, हे लक्षात येते.
गेल्या तीन ते चार दशकांमध्ये हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचा आणि प्रदूषणाचा विळखा जसजसा वसुंधरेभोवती घट्ट होऊ लागला तसतसे इथल्या तापमानात वाढ होत गेली आणि पर्यावरणीय चक्र कोलमडण्यास सुरुवात झाली. पर्यावरणशास्त्रज्ञ, हवामान शास्त्रज्ञ आणि अन्य वैज्ञानिकांनी त्याला ‘ग्लोबल वॉर्मिंग’ किंवा जागतिक तापमानवाढ, हवामान बदल अशा प्रकारच्या संज्ञा दिल्या; पण त्याच्या मुळाशी मानवाची विकासाची न संपणारी भूक होती. डोंगर, नद्या, पाणतळे, तलाव, समुद्र, शेती, झरे, जंगले अशा निसर्गाच्या वरदानांवर मानवाने चालवलेली विकासाची कुर्हाड कारणीभूत होती.
डॉ. पचौरी यांच्यासारख्या अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी 20-30 वर्षांपूर्वीच पृथ्वीवरील तापमानवाढीचे महाभयंकर परिणाम मानवाला भोगावे लागू शकतात, असा इशारा दिला होता; परंतु आर्थिक विकास म्हणजेच सर्व काही मानणार्यांनी सुरुवातीची अनेक वर्षे पर्यावरणवाद्यांना एक तर वेड्यात काढले किंवा कस्पटासमान लेखून त्यांची संभावना केली. दुर्दैवाने निसर्गाची पूजा करणारी संस्कृती असणारा भारतही याला अपवाद नाही. पाच-दहा वर्षांपूर्वीपर्यंत जागतिक तापमानवाढीच्या झळांपासून आणि हवामान बदलांच्या तडाख्यांपासून भारत तुलनेने फारसा ग्रासलेला नव्हता. भारताच्या अर्थव्यवस्थेचा, कृषी व्यवस्थेचा कणा असणार्या आणि मानवाची मूलभूत गरज असणार्या पाण्याची तहान भागवण्यासाठी आवश्यक असणार्या मान्सूनच्या वर्षावामध्ये कमी-अधिकपणा जाणवत असे. दुष्काळाचे फेरे येत असत; परंतु तो ऋतुचक्राचा भाग मानून हवामानतज्ज्ञ त्याचे आकलन करत असत. त्या काळात जगातील अन्य देशांमध्ये मात्र हवामान बदलांचे द़ृश्य परिणाम दिसू लागले होते; परंतु भारत त्यापासून तितकासा बाधित नव्हता. साधारणतः गेल्या 10-15 वर्षांमध्ये भारतालाही अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर, गारपीट, दुष्काळ, चक्रीवादळे, धुळीची वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा वारंवार सामना करण्याची वेळ येऊ लागली.
गेल्या दहा वर्षांमध्ये भारतामध्ये हवामानाचे चक्र इतके विपरीत झाले आहे की, प्रगत-अत्याधुनिक बनलेल्या हवामान विभागालाही त्याचे आकलन होईनासे झाले आहे. पूर्वी मान्सूनचा आगमनाचा कालावधी 1 जूनपासून (केरळ) सुरुवात होऊन ऑगस्टच्या मध्यापर्यंत देशभर वितरित होत असे; मात्र आता अचानक मुसळधार पाऊस, ढगफुटी, चक्रीवादळे किंवा महिनाभर कोरडे हवामान या घटना नेहमीच्या झाल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे ‘जागतिक तापमानवाढ’ व त्यामुळे उष्णकटिबंधीय समुद्रांचे तापमान वाढणे. जागतिक तापमानवाढीमुळे वातावरण जास्त बाष्प धरून ठेवत आहे. यामुळे कमी वेळेत प्रचंड पाऊस पडत आहे.
हवामान बदल ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे; परंतु मानवी क्रियाकलापांमुळे त्याचा वेग झपाट्याने वाढला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था हवामान संकटाची तयारी करण्यासाठी राज्य सरकारांना मार्गदर्शन करते. अॅग्रोमेटसारखी प्रणाली शेतकर्यांसाठी जिल्हास्तरीय हवामान अलर्ट देते; मात्र हे सर्व प्रयत्न अनेकदा भौगोलिक अचूकतेच्या आणि वेळेच्या द़ृष्टीने अपुरे ठरतात.
मान्सूनवर हवामान बदलांचा सर्वांत मोठा झालेला परिणाम म्हणजे त्याचा वाढलेला लहरीपणा. विशेषतः कमी काळात जास्त पाऊस पडणे हे सध्या मान्सूनचे ठळक वैशिष्ट्य बनले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नागपूर, मुंबईसह अनेक शहरांना याचा तीव्र फटका बसला आहे. 26 जुलै 2025 मध्ये मुंबईत झालेल्या जलप्रलयाच्या दिवशी 12 तासांत 950 मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला होता. अशा प्रकारच्या ढगफुटीच्या घटना आता पावसाळ्यात नित्याच्या झाल्या आहेत.
तसेच मान्सूनचे दिवस कमी होत चालले आहेत. पूर्वी पावसाचे दिवस 100 होते, ते आता 50 वर आले आहेत. समुद्र तापमानात झालेले तीव्र बदल, मान्सूनमधील अनिश्चितता आणि नागरी नियोजनातील त्रुटींमुळे अलीकडील काळात गंभीर संकटे उभी राहात आहेत. या संकटांचा सामना करताना कृत्रिम बुद्धीमत्ता, परम संगणक यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत, 100 हून अधिक स्टार्टअप्सच्या साहाय्याने, ‘मिशन मौसम’ अंतर्गत जोडल्या गेलेल्या संस्थांकडून मिळणार्या डेटाच्या आधारे भारतीय हवामान विभाग अधिकाधिक अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये बर्याच प्रमाणात यशही येत आहे; पण रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करायचे झाल्यास निसर्ग सर्वशक्तीमान आहे हे स्वीकारुन पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारून, वायूप्रदुषण कमी करुन, वृक्ष-जंगलांची लागवड गतिमानतेने करुन पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारणे गरजेचे आहे. कारण शेवटी, निसर्ग सर्वशक्तीमान आहे. हवामान महासंचालकांच्या म्हणण्याचा हाच गाभा आहे.
तसेच मान्सूनचे दिवस कमी होत चालले आहेत. पूर्वी पावसाचे दिवस 100 होते, ते आता 50 वर आले आहेत. समुद्र तापमानात झालेले तीव्र बदल, मान्सूनमधील अनिश्चितता आणि नागरी नियोजनातील त्रुटींमुळे अलीकडील काळात गंभीर संकटे उभी राहत आहेत. या संकटांचा सामना करताना कृत्रिम बुद्धिमत्ता, परम संगणक यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत 100 हून अधिक स्टार्टअप्सच्या साहाय्याने ‘मिशन मौसम’अंतर्गत जोडल्या गेलेल्या संस्थांकडून मिळणार्या डेटाच्या आधारे भारतीय हवामान विभाग अधिकाधिक अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये बर्याच प्रमाणात यशही येत आहे; पण रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करायचे झाल्यास निसर्ग सर्वशक्तीमान आहे, हे स्वीकारून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून, वायुप्रदूषण कमी करून, वृक्ष-जंगलांची लागवड गतिमानतेने करून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. कारण, शेवटी निसर्ग सर्वशक्तीमान आहे. हवामान महासंचालकांच्या म्हणण्याचा हाच गाभा आहे.