Water Supply Pudhari
नाशिक

Water Scarcity Chandwad |"पावसाअभावी चांदवड तालुक्यावर दुहेरी संकट! पिण्याच्या पाण्यासाठी 8 टँकर तर खरिपावर दुबार पेरणीची टांगती तलवार"

Water Scarcity Chandwad | पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही ८ टँकर, खरीपही धोक्यात, दुबार पेरणीचे संकट

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी चांदवड तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी नद्या, नाले, तलाव आणि बंधारे अद्यापही कोरडेच असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. दुसरीकडे खरीप हंगामावरही या परिस्थितीचा गंभीर परिणाम होत असून, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

मागील आठवड्यात झालेल्या तुरळक पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली असून, कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे.

त्यामुळे पेरलेले बियाणे उगवणीच्या टप्प्यावर अडचणीत आले असून, अनेक ठिकाणी उगवण अत्यंत कमी झाली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यातील जलस्रोतांना अद्याप पुरेसा पाणीसाठा मिळालेला नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे.

प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, १३ जुलैपर्यंत तालुक्यातील ९ गावे व ७ वाड्यांना मिळून एकूण ८ टँकरच्या रोज १२ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कुंडाणे, कानडगाव, दरेगाव, डोणगाव, राजदरवाडी, पुरी, वडगावपंगु, कळमदरे, काळखोडे, गंगावे, परसूल, मेसनखेडे (खुर्द) आणि तळेगावराही परिसरातील नागरिकांची तहान आजही टँकरवरच भागवावी लागत आहे.

या टँकरद्वारे सुमारे १८ हजारांहून अधिक नागरिकांना दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. जुलैचा मध्य उलटत असतानाही तालुक्यातील जलसाठे भरलेले नसल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी आता दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे.

अन्यथा पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची धावपळ सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतात पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाऊस कधी बरसणार, हा प्रश्न सध्या चांदवड तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असून, आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रशासकीय आवाहन व सद्यस्थिती

"यंदा पावसाने चांदवड तालुक्यात ओढ दिली आहे. १४ जुलैपर्यंत तालुक्यात १७५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पिकांची लागवड करावी, ज्यामुळे आर्थिक फटका बसणार नाही. सध्या तालुक्यातील ९ गावे व ७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे."
अनिल चव्हाण, तहसीलदार, चांदवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT