चांदवड (नाशिक) : जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुका विधी सेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१३) रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकन्यायालयात न्यायालयपूर्व व न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमधून एकूण १,४५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून १ कोटी ७२ लाख २२,३२१ इतकी वसुली करण्यात आल्याची माहिती न्यायाधीश एस. एस. छलानी यांनी दिली.
लोकन्यायालयात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एस. छलानी यांच्या अध्यक्षतेखाली पॅनल प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधीश व्ही. डी. सुंगारे यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य म्हणून अॅड. प्रमोद पाटील यांनी काम पाहिले. राष्ट्रीय लोकन्यायालयात एकूण १,८३० दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. लोक न्यायालयाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. एन. ठाकरे, उपाध्यक्ष अॅड. बी. जी. पाटील, तालुका विधी सेवा समितीचे सहा. अध्यक्ष एम. डी. मंडळे, के. सी. शिरव, तसेच न्यायालयीन कर्मचारी, चांदवड, वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कर, बँका व वीजबिलाच्या ३४ प्रकरणात तडजोड
दंडप्रकरणे व बँक वसुली अंतर्गत १३ लाख ७७ हजार ५४६ रुपयांची वसूली करण्यात आली. तसेच ३,५२३ प्रिलिटिगेशन प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये १,४५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायतींच्या कर, बँका व वीजबिल वसुलीच्या ३४ तडजोडी प्रकरणांतून ४७ लाख ४४ हजार ५४५ रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायालयपूर्व व न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमधून एकूण १,४५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, १ कोटी ७२ लाख २२ हजार ३२१ रुपयांची वसुली करण्यात आली.