

चांदवड (नाशिक): सुनील थोरे
एचएएल व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे चांदवड व भागातील किडनी विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
चांदवडला २७ नोव्हेंबरपासून डायलेसिस विभाग सुरू करण्यात आला. यात एकावेळी ८ रुग्णांवर उपचार करता येणार आहे. नाशिक किंवा इतर दूरच्या रुग्णालयात जाण्याचा त्रास, खर्च आणि वेळ वाचणार आहे. विभाग सुरू झाल्यापासून ४ रुग्णांनी डायलेसिस उपचार घेतले आहे. सर्व उपचार यशस्वीरीत्या पार पडले आहेत. रुग्णांसह नातेवाईकांनी सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. चांदवड, वडनेरभैरव, दिंडोरी, सटाणा, कळवण, उमराणे तसेच आसपासच्या गावातील रुग्णांना घराजवळच उच्च दर्जाची किडनी उपचार सुविधा उपलब्ध झाली आहे. चांदवडला डायलेसिस विभाग सुरू झाल्याने ग्रामीण आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावली आहे. ही सुविधा नागरिकांसाठी जीवनरक्षक ठरत आहे.
प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त
डायलेसिस विभागाचे संचालन व रुग्णांची सेवा सुनिश्चित करण्यासाठी ४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहेत. यात २ डायलेसिस टेक्निशियन, १ स्टाफ नर्स व १ स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचार्यांवर किडनी विकारतज्ञांची देखरेख असेल.
चांदवड उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलेसिस सुविधा सुरू करण्यात आली आहे. चांदवडसारख्या ग्रामीण भागात सुविधा मिळणार असल्याने गरिबांची गैरसोय कायमची मिटणार आहे. विशेषतः शासकीय योजनांचा देखील या ठिकाणी रुग्णांना लाभ मिळणार असल्याने मोफत उपचार मिळणार आहे. यासाठी तज्ञ डॉक्टर व स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. राहुल आहेर, आमदार.
रुग्णांवर मोफत उपचार
या विभागातील सर्व डायलेसिस उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे विनामूल्य दिले जात आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरणार आहे.
अत्याधुनिक डायलेसिसची सुविधा २७ नोव्हेंबरपासून चांदवडला सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ४ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. नागरिकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा.
डॉ. नवनाथ आव्हाड, वैद्यकीय अधीक्षक, चांदवड.