Nashik Road Problem Pudhari Photo
नाशिक

Nashik Road Problem | खोदकामाचा कहर, कॅनॉल रोडवर चिखलच चिखल

Nashik Road Problem | कॅनॉल रोडवर खोदकामामुळे चिखलाचे साम्राज्य; रिपरिप पावसाने रस्ता बनला घसरगुंडी, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान १८०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असले, तरी या कामाच्या संथ गतीमुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे कॅनॉल रोड परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरश: चिखलात अडकले आहे.

भोसला मिलिटरी कॉलेज ते मोतीवाला मेडिकल कॉलेज या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. हा रस्ता पावसामुळे अक्षरश: घसरगुंडी झाला आहे. परिणामी दररोज लहान-मोठे अपघात होत असून, या मार्गे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मागील चार महिन्यांहून अधिक काळापासून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, खोदकाम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याऐवजी राडारोडा रस्त्याच्या दुतर्फा टाकून ठेवण्यात आलेला आहे. हा मुरुम व माती पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावर पसरत असल्यामुळे संपूर्ण मार्ग चिखलमय झालेला आहे.

जागोजागी खोल खड्डे, निसरडा चिखल आणि साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांना नियंत्रण करणे अवघड होत आहे. अपघाताच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. मागील काही काळापासून या मार्गावर वाहतूक वाढलेली असून, या मार्गावर अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

दररोज शेकडो विद्यार्थी शालेय बस, रिक्षा आणि दुचाकींवरून या रस्त्याने प्रवास करतात. अनेक पालक मुलांना दुचाकीवरून शाळेत सोडतात. मात्र, निसरड्या रस्त्यावरून वाहन चालवताना अपघाताची भीती सतावत असल्यामुळे जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन केले नाही, असा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.

खोदकामानंतर रस्ता वाहतूकयोग्य करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात अशा अवस्थेत काम सुरू ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल वाढले असून, प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून साचलेले पाणी काढावे, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.

  • रस्त्यावरील राडारोडा तातडीने हटावावा.

  • खड्डे बुजवून तात्पुरता तरी सुरक्षित रस्ता तयार करावा.

  • संत कबीरनगरमधील साचलेले दूषित पाणी काढावे.

  • शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात.

  • पावसाळ्यात दररोज रस्त्याची स्वच्छता व देखभाल करावी.

रोजची कसरत, वाढते अपघात

जागोजागी पडलेले खड्डे आणि चिखलामुळे वाहनचालकांना अक्षरश: कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. अनेक दुचाकी घसरल्याच्या घटना घडत आहेत. काही वाहनांचे नुकसानही झालेले आहे. पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची अवस्था अधिक बिकट झालेली आहे. रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित जागा शोधणेही कठीण झाले आहे.

संत कबीरनगरमध्ये पाण्याच्या डबके

संत कबीरनगर झोपडपट्टी परिसरात परिस्थिती अधिकच गंभीर आहे. येथे १५ दिवसांपासून पावसाचे पाणी रस्त्यावर साचून डबके तयार झालेले आहे. पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना याच पाण्यातून ये-जा करावी लागत आहे.

याहून धक्कादायक बाब म्हणजे या डबक्यात सार्वजनिक शौचालयातील सांडपाणी मिसळत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झालेला असून, संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढला आहे. तरीही मनपा प्रशासनाकडून पाणी उपसण्याची किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची कारवाई केली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT