इगतपुरी : नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे जवळील व्हीटीसी फाट्याजवळ आज(दि. 12) सकाळी एसटी बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले असून ही बस नाशिकहून कसाराकडे जात होती. बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला असून या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहे.
ह्या घटनेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय देवराम सदावर्ते वय ५१ रा. घोटी ग्रामीण रुग्णालय, बसचा चालक दयाराम निवृत्ती सहाणे वय ४५ रा. पाथर्डी फाटा, तेजस निवृत्ती पगार वय ४२ रा. नाशिक, मोहन रामराव वाघमारे वय ४४ रा. शिवाजीनगर सातपूर, कुंदन वसंतराव पाटील वय ३१, प्रतिमा दिघे रा. नाशिक आणि ट्रक ड्रायव्हर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. वाडीवऱ्हे ते विल्होळी दरम्यान राज इंफ्रास्टक्चर कंपनी कडून सिमेंट क्राँक्रीटीकरणाचे काम एका लेंथवर अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तर दुसऱ्या बाजुच्या एकेरी मार्गावरच दुहेरी वाहतुक सरू असून या मार्गावर असंख्य मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रोजच सात ते आठ लहान मोठे अपघात होत आहे. तर सगळ्यात जास्त अपघात दुचाकीचे होत असून राज इंफ्रा स्टॅक्चर कंपनीकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली गेलेली दिसत नाही.
रविवार दि. ११ रोजी ही रात्री १० वाजेच्या सुमारास दोन तास मोठी वाहतुक कोंडी झाल्याने चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गाचे काम करणाऱ्या राज इंफ्रा स्ट्रॅक्चर कंपनीकडुन सुरु असलेले रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी प्रवासी व वाहन धारकांकडून करण्यात येत आहे.